गोदावरी कायम प्रवाहित, निर्मळ राहण्यासाठी कटिबद्ध

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटींची विकासकामे

नाशिक ः प्रतिनिधी
गोदावरी निर्मळ राहण्यासाठी, अविरल वाहण्यासाठी कामे सुरू केली आहेत. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे 35 हजार कोटींची कामे करण्यात येत आहेत. गोदावरी नदी पूर्णपणे स्वच्छ ठेवण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले जात असून, कुठलेही घाण पाणी नदीत जाणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. घाटांची संख्या व लांबी वाढविणे, कुंडांचे पाणी पुनर्वापर प्रणालीद्वारे स्वच्छ ठेवणे, तसेच भाविकांसाठी सुविधा वाढविण्यावर भर दिला जात आहे. या प्रक्रियेत साधू, महंतांचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वरचा कुंभमेळा हा प्रशासनाचा नाही, तर साधू-संतांचा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. अखिल भारतीय संत समितीने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते.

अखिल भारतीय संत समिती, राष्ट्रीय कार्य समितीच्या दोन दिवसीय बैठकीचा समारोप तपोवनातील श्री स्वामीनारायण मंदिरात झाला. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाला कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, अखिल भारतीय संत समिती अध्यक्ष अविचल देवाचार्यजी, महंत श्री ग्यान देवसिंग महाराज, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्रपुरी महाराज, संत निवृत्ती महाराज, रावसाहेब महाराज गोसावी, पुरुषोत्तम महाराज देहूकर, अशोक तिवारी, श्री यतिंद्रानंद गिरीजी महाराज, जनार्दनहरी महाराज, स्वामी संविदानंद सरस्वती, जितेंद्रानंद स्वामी, ब्रह्मेशनंद महाराज, राजेंद्र दास, महंत दुर्गादास महाराज, भक्तिचरणदास महाराज आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भाविकांना गोदावरीच्या निर्मळ आणि प्रवाही पाण्यात स्नान करता यावे म्हणून उपाययोजना केल्या जात आहेत. त्र्यंबकेश्वर येथे गोदवारीचा प्रवाह बारमाही व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. कुशावर्तासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर रस्ता, नाशिक परिक्रमा मार्ग, रेल्वे स्थानकावरील सुविधा, घाटांची संख्या आणि लांबी वाढविणे, जुन्या मंदिरांचे संवर्धन, मंदिराकडे जाणार्‍या मार्गांचे रुंदीकरण, ओझर विमानतळाचे विस्तारीकरण आदी विकासकामे सुरू आहेत.
कुंभमेळ्याकरिता प्रयागराजच्या धर्तीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. मागील कुंभमेळ्याच्या तुलनेत यंदा दहापट अधिक भाविक येण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. विकासकामे करताना साधू, महंत आणि आखाड्यांकडून आलेल्या सूचनांचाही स्वीकार करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
कुंभमेळा भारतीय आध्यात्मिक संस्कृतीचा सर्वांत मोठा सोहळा आहे. मन आणि आत्म्याच्या शुद्धीकरणाचा हा सोहळा आहे. विचारांच्या प्रदूषणाला दूर सारून भारतीय संस्कृतीला प्रवाहित करण्याचे हे पर्व आहे. या सोहळ्यात सर्व जातीधर्माचे भाविक सहभागी होत असल्याने कुंभमेळा हा राष्ट्रीय एकात्मतेचे आणि भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे, असेही त्यांनी सांगितले. कुंभमेळ्यात केवळ पवित्र स्नान होत नाही, तर साधू-संतांचे मार्गदर्शन, विचारांचे आदानप्रदान होत असल्याने पुढील वर्षी होणारा कुंभमेळा अविस्मरणीय होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकामुळे समाजातील गैरप्रकारांना आळा बसेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. भोंदूगिरी करणार्‍यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. राज्यात गोसंरक्षण, धर्मांतरविरोधी कायदे आणि महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना केल्याचे सांगत, सनातन परंपरेचे रक्षण आणि समाजातील पाखंडी प्रवृत्तीवर कारवाई करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. यावेळी अविचल देवाचार्य, जितेंद्रानंद स्वामी, रवींद्रपुरी महाराज, तुषार भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले, महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप, माजी आमदार बाळासाहेब सानप, महानगरपालिकेचे नगरसेवक यांच्यासह देशभरातून आलेले साधू, संत, महंत उपस्थित होते.

कुंभमेळ्यासाठी कायमस्वरूपी जागा आरक्षित करणार

दर बारा वर्षांनी होणारा कुंभमेळा सर्वांच्या आस्थेचा विषय आहे.उत्तर प्रदेश किंवा उज्जैैन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध असते. त्यामुळे तेथे देशभरातून लाखो भाविक दर्शन, स्नानासाठी येतात. पण नाशिक येथे जागा सीमित असल्याने दर बारा वर्षांनी शेतकर्‍यांकडून, विकासकांकडून जागा घेतली जाते. यापुढे ती जागा कायमस्वरूपी आरक्षित करण्याचा मानस असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Committed to keeping Godavari flowing and pure

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *