नाशिकनगरीत दरवर्षी निघणारा श्रीराम रथोत्सव तथा रामरायाची रथयात्रा ही शहराची महत्त्वाची परंपरा तथा धार्मिक आणि सांस्कृतिक कार्याचा मानबिंदूच म्हणता येईल. ‘सियावर रामचंद्र की जय’, ‘महारुद्र हनुमान की जय’, अशा जयघोषाने प्रभू श्रीरामाची नगरी असलेल्या पंचवटीचा परिसर दुमदुमून गेला होता. ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या श्रीराम रथ व गरुड रथाचा उत्सव पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात आणि सनई-चौघड्याच्या मंगल स्वरांनी भक्तिमय वातावरणात पार पडला. श्री काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजापासून सायंकाळी सहा वाजता रथोत्सवाला सुरुवात झाली. उत्सवाची सुरुवात गरुड रथाच्या मानकर्यांच्या हस्ते विधिवत पूजनाने झाली. उत्सवमूर्ती वाजतगाजत मंदिराबाहेर आणण्यात आल्यावर भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. यंदाचे मानकरी नरेंद्रबुवा पुजारी यांनी मंदिर प्रदक्षिणेनंतर मूर्ती गरुड रथात विराजमान केली. त्यानंतर रामनाम आधाराश्रमाजवळ गरुड रथातील मूर्तीची पालखीने रामरथात स्थापना करण्यात आली. दोन्ही रथ आकर्षक विद्युत रोषणाईने उजळले होते. रथाच्या मार्गावर ठिकठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
महावीर जयंतीनिमित्त मिरवणूक
‘बोलो महावीर की जय’ अशा जयघोषात जगभर अहिंसेचा संदेश पसरवणार्या भगवान महावीर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकाळपासूनच धार्मिक वातावरण तयार झाले होते. दहीपूल येथील श्री धर्मनाथ देरासर येथून शोभायात्रेला सुरुवात होताच ‘अहिंसा परमो धर्मः’, ‘जिओ और जीने दो’, ‘जय जिनेंद्र’, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. शुभ्रवस्त्र परिधान केलेले हजारो महिला, पुरुष, युवक-युवती जैनधर्म ध्वजाखाली एकत्र येत शिस्तबद्ध पद्धतीने शोभायात्रेत सहभागी झाले होते. बॅण्ड पथकांच्या तालावर युवकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. भगवान महावीरांच्या जीवनावर आधारित सजीव देखावे, धार्मिक संदेश देणारे फलक आणि पोवाड्यांमुळे वातावरण भक्तिमय झाले होते. या शोभायात्रा तथा मिरवणुकीचा समारोप महाकवी कालिदास कलामंदिर येथे झाला.
विविध क्षेत्रांतील महिलांचा सन्मान
ऑल इंडिया लिनेस क्लब आणि महिला पतंजली योग समितीच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्या महिलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात देशाला घडविण्यात भारतीय स्त्रीचे योगदान या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धकांनी अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, सुनीता विल्यम्स, सुधा मूर्ती, सिंधूताई सपकाळ यांच्या जीवनकार्यावर प्रभावी भाषणे सादर केली. काही स्पर्धकांनी ऐतिहासिक व्यक्तिरेखांच्या वेशभूषेत सहभागी होत कार्यक्रमात रंगत आणली. विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देऊन गौरविले. याचबरोबर भारत सरकारतर्फे 2022 ते 2025 या कालावधीत इस्रायलमध्ये योग अॅम्बेसेडर म्हणून कार्यरत राहिलेल्या दर्शना राजपूत यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
विडंबनपर पुस्तकांचे प्रकाशन
तु. सी. ढिकले यांच्या ‘राहिले ते तीर्थ’ या ललित लेखसंग्रहाचे व ‘भाजके फुटाणे अन् खारे शेंगदाणे’ या विडंबनपर गीतसंग्रहाचे प्रकाशन मु. शं. औरंगाबादकर सभागृहात झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे माजी आमदार नानासाहेब बोरस्ते उपस्थित होते. ज्येष्ठ लेखक नरेश महाजन अध्यक्षस्थानी होते. कवी विवेक उगलमुगले, संजय आहेर, वैशाली प्रकाशनाचे संचालक विलास पोतदार, अलका ढिकले यांची प्रमुख उपस्थिती होती. महाजन यांनी अध्यक्षीय मनोगतात विडंबनपर काव्यप्रकाराबद्दल विवेचन केले. याप्रसंगी प्राचार्य राजेश्वर शेळके, अरुण इंगळे यांनी विडंबनगीते सादर केली. विजय पाटील व सावळीराम तिदमे यांच्या हस्ते ढिकले यांचा सत्कार करण्यात आला.
अनहद फेस्टमध्ये रंगली
सुरांची मैफल
नाशिकनगरीत अनहद फेस्ट-2026 हा स्वर-मूल्याचा त्रिवेणी संगम मोठ्या दिमाखात पार पडला. प्रोजेक्ट अनहद संस्थेच्या यशस्वी तीन वर्षांच्या पूर्ततेनिमित्त आयोजित हा महोत्सव केवळ संगीताची मेजवानी नव्हती, तर तो कलेतून प्रकटलेला एक उदात्त सेवाभाव ठरला. कार्यक्रमाची नांदी भरतनाट्यमच्या सात्त्विक दर्शनाने झाली. गुरू निकिता कुलकर्णी-मुळे आणि गुरू शिवानी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्या आराध्या नायर व ईशा मनवानी यांनी कार्यक्रम सादर केला. विनायक कौभुवम सादर करून गणरायाला बंदन केले. ‘श्री रामचंद्र कृपालु’ या भजन सादरीकरणाने सभागृह भक्तिरसात चिंब झाले. गुरू कीर्ती शुक्ला, गुरू गौरी औरंगाबादकर आणि त्यांच्या शिष्यांनी तराना हा शास्त्रीय प्रकार आधुनिक संगीतशैलीत गुंफून सादर केला. या कार्यक्रमाद्वारे जमा झालेला निधी नॅब संस्थेला देण्यात आला.
मराठी भाषा संवर्धक,
लेखकांचा सत्कार
राज्य शासनाच्या निर्देशानुसार नाशिक जिल्हा मराठी भाषा समितीच्या वतीने जिल्ह्यातील मराठी भाषा संवर्धक, अभ्यासक, संशोधक, लेखकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आमदार प्रा. देवयानी फरांदे, महापालिकेच्या शिक्षणाधिकारी डॉ. मिता चौधरी, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे, शिक्षणाधिकारी सरोज जगताप आदी उपस्थित होते. विवेक उगलमुगले यांनी सन्मानार्थींच्या वतीने मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात उल्हास रत्नपारखी, दत्ता पाटील, ऐश्वर्य पाटेकर, संजय वाघ, सतीश बोरा, विनायक रानडे, माधुरी माटे, अनंत येवलेकर, सचिन चंद्रात्रे, मनोहर विभांडिक, संजय चौधरी, विवेक उगलमुगले, जयश्री वाघ, काशीनाथ महाजन, विजयकुमार मिठे, संयुक्ता कुलकर्णी, विलास पंचभाई यांचा सन्मान करण्यात आला.
आदिशक्ती पुरस्कार वितरण सोहळा
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्रीसाई बहुद्देशीय संस्था व शिवसेना (शिंदे गट) यांच्या संयुक्त विद्यमाने आदिशक्ती पुरस्कार वितरण सोहळा झाला. या कार्यक्रमात आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या महिला कर्मचार्यांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्याचे आयोजन संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा तथा शिवसेना जिल्हाप्रमुख संगीता पाटील यांनी केले होते.
कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. व्यासपीठावर उपमहापौर विलास शिंदे, शिवसेना उपनेते तथा जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश शिंपी उपस्थित होते. उपमहापौर शिंदे यांनी सांगितले की, या महिलांनी कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी रुग्णांची सेवा केली, हे समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी महिलांनी इतरांची सेवा करताना स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष देण्याचे आवाहन केले.
महिला उद्योजकांचा गौरव
मराठा सेवा संघप्रणीत मराठा उद्योजक कक्षातर्फे राजमाता जिजाऊ उद्योगरत्न पुरस्कार-2026 चे वितरण करण्यात आले. केबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात हा पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. यावेळी उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या नाशिकमधील 22 महिला उद्योजकांचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
या समारंभात उपस्थित महिलांना उद्योग विकास, व्यवस्थापन तसेच डिजिटल साधनांच्या वापराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला महापौर हिमगौरी आहेर-आडके, मविप्रचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, डॉ. प्रसाद सोनवणे, महानगरप्रमुख नितीन सुगंधी, प्राचार्य प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.
Shri Ram Rathod was celebrated with joy, preserving the traditions of Nashik.