सातपूर: प्रतिनिधी
सातपूर परिसरात लैंगिक शोषण व फसवणुकीच्या गंभीर प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तथाकथित पत्रकार तसेच कन्सल्टंट रवींद्र एरंडे याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. एरंडे याने लैंगिक शोषण केलेल्या आणखी 8 महिलांची ओळख पटवण्यात आल्याने एरंडे च्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणाचा अजून तपास करायचा असल्याने पोलिसांनी कोठडी वाढून मागितली होती. न्यायालयाने आणखी 4 दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. सातपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या लैंगिक शोषण व फसवणूक प्रकरणातील संशयित आरोपी रवींद्र नारायण एरंडे (वय 63, रा. नीलकंठेश्वरनगर, अशोकनगर, सातपूर) दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. या दोन दिवसात पोलिसांनी एरंडे याच्या कार्यालयाची झाडाझडती घेतली होती. . त्याला आज जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित एरंडे याने गरजू महिलांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार दाखल झाली होती. तसेच संबंधित महिलांचे व्हिडिओ चित्रीकरण करून त्यांना ब्लॅकमेल करत त्यांची फसवणूक केल्याचाही आरोप आहे.
या प्रकरणात तपासादरम्यान संशयिताकडून सुमारे 100 हून अधिक महिलांशी संबंधित व्हिडिओ असलेला पेन ड्राइव्ह, डीव्हीआर जप्त करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली होती.
या प्रकरणात आणखी पीडित महिलांनी पुढे येऊन तक्रार दाखल करावी, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
सातपूर च्या नागरिकांना धक्का
पत्रकारिता करत असलेल्या एरंडे याने सातपूर कॉलनी भागात स्वतःचे चांगलेच बस्तान बसवले होते. वेगवेगळ्या राजकीय मंडळी सोबत त्याचा सातत्याने वावर असत. सावरकर नगर येथील अभ्यासिका महापालिकेच्या मालकीच्या इमारतीत असूनही एरंडे याने येथे स्वतःच्या मालकीची असल्याप्रमाणे कब्जा मिळवला होता. राजकिय मंडळी सोबत वावरताना येथे असलेल्या ग्रीन जिमचा विकास केला. या ग्रीन जिम साग ताबा देखील स्वतःकडे असल्यासारखा तो वागत असल्याचे नागरिक आता बोलत आहेत. गरजू महिलांची अशा पध्दतीने त्याने पिळवणूक केल्याचे प्रकार उघड झाल्याने त्याच्या प्रतिमेला तडा गेला आहे.