विचारांतून जिवंत आहेत…बाबासाहेब!

जे जिवंत आहे ते एक ना एक दिवस नष्ट होणार, हा तर प्रकृतीचा नियम आहे, यात तर काही शंकाच नाही. परंतु जे मृत्यूनंतरही अमर राहतात, तेच खरे सत्य आणि चिरकाल बनतात. अशी व्यक्ती खूप प्रभावशाली बनते आणि कधीकधी घातकही बनते. अशीच एक महान व्यक्ती, डॉ. भीमराव आंबेडकर हे जिवंतपणे जितके नाही, तितके अधिक मरणोपरांत अधिक प्रभावशाली, परिणामकारक आणि आक्रमक बनले आहेत. जीवित बाबासाहेब एक व्यक्ती होती, एक शरीर होते, एक आवाज होते. तिच्यासोबत लोक असहमत असू शकत होते, जिचा विरोध केला जाऊ शकत होता, ज्याची निंदा केली जाऊ शकत होती, जिच्याकडे दुर्लक्षही केले जाऊ शकत होते. परंतु त्यांच्या महानिर्वाणानंतर सर्वकाही बदलून गेले. आता बाबासाहेब कोणीएक व्यक्ती राहिले नाहीत, आता ते एक विचार बनले आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती विचार बनते, तेव्हा त्या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीच्या आयडेंटिटीला नष्ट करणे असंभव होते. कारण व्यक्तीला मारलं जाऊ शकतं, परंतु विचारायला मारणं शक्य नाही.
आज बाबासाहेब एका कुठल्या विशिष्ट जाती, धर्म, पंथ, समाज, वर्ण किव्हा वर्गापुरते सीमित नाहीये. बाबासाहेब अशा प्रत्येक व्यक्तीत जिवंत आहे, जो अधिकारासाठी उभा आहे, जो समानतेसाठी उभा आहे, जो न्यायहक्कांसाठी लढतो, जो अन्यायाला बळी पडण्यास विरोध करतो…हीच तर त्यांची खरी अमरता आहे. ही अमरता कशी आली असेल बरं? विचार करा.. जेव्हा बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेला आकार देण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांनी फक्त एक पुस्तक किंवा ग्रंथ नाही लिहिला. त्यांनी प्रत्येक भारतीयाच्या मनात एक चेतना फुंकली. आता ती चेतना केवळ संविधानाच्या कागदावर राहिली नाही, तर ती प्रत्येक भारतीयाच्या मनामनांत जागृत झाली आहे. प्रत्येकाच्या श्वासात आणि प्रत्येकाच्या नसानसांत भिनलेली आहे. बाबासाहेब जर आज जिवंत असते, तर कदाचित काळानुसार त्यांचे शब्द, त्यांचे विचार, त्यांचे स्वप्न आणि त्यांचे कार्य क्षीण झाले असते. पुढे जाऊन हे सर्व इतिहासाच्या पानांखाली दाबले गेले असते. पण तसे होणे नाही. आता तेच विचार, स्वप्न आणि कार्य शब्दरूपात संविधान बनली, तर ती आता एक व्यवस्था बनली आहे आणि व्यवस्थेला मिटवणे व्यक्तीला मिटवण्यापेक्षा कैकपट अधिक कठीण काम आहे. ती व्यवस्था आता देशाची ओळख बनली आहे, देशाच्या पुढील वाटचालीची दिशादर्शक तत्त्व बनली आहे.
विचार करा, जर बाबासाहेबच नसते तर आपला भारत देश खरोखर स्वतंत्र आणि लोकशाही देश बनू शकला असता का? बनलाही असता आणि एक वेगळे असे संविधान लिहिलेही गेले असते. शक्यता आहे. पण ते संविधान फक्त एक शब्दकोश किंवा शब्दांचा संग्रह झाला असता. त्यात भारतीयांचा आत्मा नसता, भारतातील तळागाळातील, गरिबातील गरिबांच्या भावना नसत्या. देशातील वंचित, शोषित, पीडित जनतेच्या वेदनांची, त्यांच्या दुःखाची, त्यांच्या मजबुरीची, आणि त्यांच्या अपेक्षांची दखल घेतली गेली असती का? याबद्दल मी साशंक आहे. शतकानुशतके अन्याय आणि अत्याचार सहन करत आलेल्या पीडित आणि वंचितांना काय स्थान मिळाले असते, माहीत नाही. अशा संविधानात ती जिद्द नसती, जी प्रत्येक भारतीयाला समानतेची आणि आत्मसन्मानाची वागणूक देईल. अशा घटनेवर आधारित लोकशाही ही केवळ नामधारी लोकशाही बनली असती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *