रोटरी भूषण पुरस्कार डॉ. नेहेते, शिरोरे यांना प्रदान करणार
17 एप्रिलला सन्मान सोहळा
नाशिक : प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे देण्यात येणारा यंदाचा ‘नाशिक भूषण 2025-26’ पुरस्कार उद्योग व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे उद्योजक पीयूष सोमाणी यांना जाहीर झाला आहे. ‘रोटरी भूषण’ पुरस्कार डॉ. राजेंद्र नेहेते व विलास शिरोरे यांना प्रदान करण्यात येणार आहे.
पुरस्कार वितरण सोहळा येत्या शुक्रवारी, दि. 17 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता प्रख्यात आयटीतज्ज्ञ व लेखक डॉ. उदय निरगुडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.
नाशिक ही जन्मभूमी किंवा कर्मभूमी असलेल्या आणि आपल्या कर्तृत्वाने शहराचे नाव उज्ज्वल करणार्या व्यक्तींना गौरविण्याच्या उद्देशाने ‘नाशिक भूषण’ पुरस्काराचा उपक्रम रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे 1996-97 पासून राबविण्यात येत आहे. यापूर्वी कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर, प्रा. वसंत कानेटकर, डॉ. वसंतराव गुप्ते, विनायकराव पाटील, शांताबाई दाणी, डॉ. वसंतराव पवार, बापू नाडकर्णी व कुसुमताई पटवर्धन यांसारख्या मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
यंदाचे पुरस्कार विजेते पीयूष सोमाणी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रातील सुप्रसिद्ध उद्योजक आहेत. ‘ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन लिमिटेड’चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहेत. त्यांनी उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात केलेले योगदान लक्षणीय मानले जाते.
दरम्यान, या सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष डॉ. गौरव सामनेरकर, सचिव सीए रेखा पटवर्धन, प्रकल्प सचिव मकरंद चिंधडे, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष सीए उदयराज पटवर्धन व जनसंपर्क संचालक अॅड. विद्युल्लता तातेड यांनी केले आहे.
Nashik Bhushan Award announced for Piyush Somani