राज्य शासनाच्या मनपा वैद्यकीय विभागाला सूचना
नाशिक : प्रतिनिधी
शहरातील पंड्या हॉस्पिटलमध्ये दीड वर्षापूर्वी अवैध गर्भपाताचे प्रकरण समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी मुंबई नाका येथील मालती आयव्हीएफ सेंटर मनपाच्या वैद्यकीय विभागाने सील केले. दरम्यान, शहरातील सोनोग्राफी सेंटर व गर्भपात सेंटरची येत्या सोमवार(दि. 20)पासून मनपाच्या वैद्यकीय विभागाकडून झाडाझडती घेतली जाणार आहे. यासंदर्भात राज्याच्या आरोग्य विभागाने तशा सूचना बुधवारी (दि.15) मनपाच्या आरोग्य विभागाला केल्या.
राज्याच्या आरोग्य विभागाने सोनोग्राफी सेंटर, तसेच गर्भपात केंद्रांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नाशिक महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागामार्फत सोमवारपासून गोपनीय पद्धतीने शहरातील सर्वच सोनोग्राफी सेंटर आणि गर्भपात केंद्रे तपासणीसाठी धडक मोहीम राबविण्यात येणार आहे. याकरिता मनपा वैद्यकीय अधिकार्यांची आठ भरारी पथके स्थापन करून त्यांच्यामार्फत संबंधित सेंटर तसेच केंद्रांची तपासणी केली जाईल. सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांची नोंदणी, मशिन खरेदी व नोंदणी तसेच इतर सर्व रेकॉर्डची तपासणी होणार आहे. त्यानंतर याबाबतचा अहवाल तातडीने राज्य शासनाच्या आरोग्य विभागाला सादर केला जाईल. नाशिक शहरात आजमितीस 424 सोनोग्राफी सेंटर आणि 121 गर्भपात केंद्रांना मनपाच्या आरोग्य वैद्यकीय विभागाने मान्यता दिलेली आहे. तपासणीदरम्यान कुठल्याही प्रकारे संशयास्पद वस्तू आढळल्यास नर्सिंग अॅक्टनुसार संबंधितांवर कारवाई
केली जाईल.
गर्भधारणापूर्व आणि गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा तसेच वैद्यकीय गर्भपात कायद्याप्रमाणे गर्भलिंग निदान करणे कायद्याने गुन्हा आहे. दंडात्मक कारवाईसह दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद या
प्रकरणात आहे.
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून शहरातील सोनोग्राफी सेंटर व गर्भपात केंद्रे तपासणीच्या सूचना आल्या आहेत. त्यानुसार आरोग्य अधिकार्यांची पथके तयार करून महिनाभर ही मोहीम चालवली जाणार आहे. संशयास्पद बाबी आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.
– डॉ. जितेंद्र धनेश्वर, सहा. आरोग्य अधिकारी, मनपा
Sonography center to be closed from Monday