जनजागृतीचे नवे ‘डिजिटल अस्त्र’

आजचा काळ हा वेगाचा आहे. सकाळच्या चहासोबत सविस्तर वृत्तपत्र वाचणार्‍या पिढीकडून, आता जाता-येता मोबाइलवर बातम्यांचे ’अपडेट्स’ घेणार्‍या पिढीकडे आपला प्रवास झाला आहे. अशा या माहितीच्या महापुरात, वाचकांचे आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणे हे माध्यम क्षेत्रापुढील एक मोठे आव्हान बनले आहे. यातूनच उगम झाला आहे तो ’शॉर्ट व्हिडिओ’ आणि ’इन्फोग्राफिक्स’चा. आज ही केवळ मनोरंजनाची किंवा टाइमपासची साधने राहिलेली नाहीत, तर ती सामाजिक भान आणि जनजागृती निर्माण करणारी अत्यंत प्रभावी डिजिटल अस्त्रे बनली आहेत.
रील्स किंवा शॉर्टस् म्हणजे केवळ नाच-गाणे आणि विनोद असा एक समज होता, पण आता चित्र बदलले आहे. साठ सेकंदाच्या या छोट्या व्हिडिओमध्ये आता अत्यंत महत्त्वाचे आणि गंभीर सामाजिक विषय मांडले जात आहेत.
उदाहरणार्थ, मकर संक्रांतीच्या काळात ’नायलॉन मांजा’मुळे पशुपक्ष्यांचे आणि माणसांचे होणारे जीवघेणे अपघात असोत किंवा शहरातील वाढत्या काँक्रीटीकरणामुळे आणि जाहिरातींचे फलक, खिळे ठोकल्यामुळे गुदमरणारी आणि मरण पावणारी झाडे असोत; हे विषय जेव्हा एका प्रभावी आणि भावनिक व्हिडिओद्वारे मांडले जातात, तेव्हा ते थेट लोकांच्या मनाला भिडतात. कमी वेळेत, दृश्य स्वरूपात मिळणारी ही माहिती शेअर करणे सोपे असल्याने ती क्षणार्धात व्हायरल होते आणि एका मोठ्या लोकचळवळीचे किंवा मोहिमेचे रूप घेऊ शकते.
अनेकदा सरकारी योजना, शहराचा भविष्यातील विकास आराखडा किंवा महापालिकेचे क्लिष्ट बजेट हे विषय सामान्य माणसाला कंटाळवाणे आणि समजायला कठीण वाटतात. पण जेव्हा हेच आकडे आणि माहिती रंजक ’इन्फोग्राफिक्स’च्या माध्यमातून समोर येते, तेव्हा ती अगदी सहज समजते.
नंदिनीसारख्या स्थानिक नद्यांच्या प्रदूषणाची पातळी आणि वाढती जलपर्णी असो किंवा शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रस्तावित असलेले नवीन उड्डाणपूल, विकासकामे आणि महामार्गांचे जाळे असो, नकाशा, रंग आणि आलेख वापरून तयार केलेले इन्फोग्राफिक्स एका दृष्टिक्षेपात संपूर्ण परिस्थिती आणि समस्येचे गांभीर्य स्पष्ट करतात. यामुळे वाचक केवळ माहिती वाचत नाही, तर ती समजून घेऊन त्यावर विचार करू लागतो.
या नव्या माध्यमाला खर्‍या अर्थाने गती आणि वेगळेपण दिले आहे ते ’जनरेटिव्ह एआय’ने. आजच्या गतिमान मीडिया आणि पत्रकारितेत वेळेला खूप महत्त्व आहे. बातमीची सत्यता पडताळून ती लवकरात लवकर वाचकांपर्यंत आकर्षक स्वरूपात पोहोचवताना या एआय टूल्सचा मोठा आधार मिळतो.
बातमीला साजेसे आणि अगदी हुबेहूब वाटणारे एआय जनरेटेड पोर्ट्रेट्स तयार करण्यापासून ते गुंतागुंतीच्या माहितीचे आणि डेटाचे काही सेकंदात आकर्षक इन्फोग्राफिक्समध्ये रूपांतर करण्यापर्यंत, एआयच्या मदतीने मीडिया प्रॉडक्शनचे काम अत्यंत सोपे आणि जलद झाले आहे. यामुळे दर्जेदार आशय निर्मितीसाठी आणि जनजागृतीचे व्हिडिओ तयार करण्यासाठी लागणारा वेळ वाचतो आणि बातमी अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत
पोहोचवता येते. बदलत्या काळानुसार माध्यमे बदलत आहेत आणि माहिती देण्याच्या पद्धतीही! शॉर्ट व्हिडिओ आणि इन्फोग्राफिक्स ही या नव्या युगाची भाषा आहे. क्लिष्ट प्रश्नांना सोप्या, सुटसुटीत आणि आकर्षक पद्धतीने लोकांसमोर आणण्याचे हे तंत्र जितके अधिक जबाबदारीने वापरले जाईल, तितकीच आपली व्यवस्था अधिक सजग होईल.
हे नवे अस्त्र केवळ ’लाइक्स’ आणि ’व्ह्यूज’ मिळवण्यासाठी नाही, तर प्रशासनाला जाब विचारण्यासाठी, समाजातील सुप्त प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि खर्‍या अर्थाने एक सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आहे. माहितीच्या या नव्या माध्यमावर ज्याची पकड असेल, तोच उद्याच्या सजग समाजाचा आवाज बनेल!

New ‘digital weapon’ for public awareness

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *