नाव ‘मोटे’; लक्षण खोटे!

अनैतिकतेच्या खांबावर उभे असलेले साम्राज्य कधीही कोसळू शकते, याचा प्रत्यय आणून देणार्‍या घटना गेल्या काही महिन्यांता सातत्याने घडत आहेत. कॅप्टन अशोक खरात असो वा ’झुकेगा नही साला’ म्हणत व्हिडिओमध्ये माकडचाळे करणारा मोटेगावकर. खरातने महिलांच्या असहायतेचा गैरफायदा घेतला, तर शिवराज मोटेगावकरने मुलांचे उज्ज्वल भविष्य पाहणार्‍या सामान्य पालकांचा. तसे पाहू गेल्यास खरात असो वा मोटेगावकर, हे दोघेही एकाच माळेचे मणी म्हणावे लागतील. दोघांचेही ध्येय फक्त पैसा जमा करणे, साम्राज्य निर्माण करणे, हेच होते. आज दोघांचीही अवस्था ’ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात ’लातूर पॅटर्न’ कधीकाळी चांगलाच गाजला. पूर्वी एखादा विद्यार्थी अभ्यासात कच्चा असेल तर त्याच्यासाठी शिकवणी हा एक पर्याय होता. त्यातून विद्यार्थ्याची बौद्धिक प्रगती व्हावी, हा त्यामागील खरे तर उदात्त हेतू होता. पण नंतरच्या काळात क्लासेसचे पेव फुटले. अनेकांना हा व्यवसाय म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी वाटू लागली. त्यातून स्पर्धा, ईर्षा सुरू झाली. ’तेरी साडी से मेरी साडी सफेद’ या पद्धतीने आपलाच क्लास कसा सरस आहे, हे दाखविण्यासाठी अहमहमिका लागली. खिसेकापू स्पर्धा सुरू झाली. पालक, पाल्य आकर्षित होण्यासाठी जाहिरातबाजी सुरू झाली. एक विद्यार्थी, पण वेगवेगळ्या क्लासमधला टॉपर असल्याचे दाखविण्याचा नवा फंडा या क्लासचालकांनी सुरू केला. लाखो रुपयांची फी, चकचकीत इमारती, डिजिटल क्लासरूम, सुविधा यातून पालकांच्या खिशावर डल्ला मारण्याचे हे उद्योग अलीकडच्या काळात मोठा बिझनेस झाला आहे. पाल्याच्या भवितव्याविषयी पालक स्वप्नाळू असतात. जे कष्ट आपल्या वाटेला आले ते पाल्याच्या वाटेला येऊ नये म्हणून कधी पोटाला चिमटा काढत, काटकसर करून पोरगा डॉक्टर, इंजिनिअर व्हावा असे प्रत्येक आई-बापाचे स्वप्न असते. त्यामुळे पैशांचा विचार न करता चांगला क्लास, चांगल्या महाविद्यालयात पाल्याला ठेवतात. मोटेगावकरसारखी गिधाडे असे सावज टिपण्यास तयारच असतात. पालकांच्या याच स्वप्नांवर ही मंडळी त्यांच्या साम्राज्याचे मजले उभे करतात. कोटा, लातूर यांसारख्या ठिकाणी क्लासेसचे जे पेव फुटले आहेत ते केवळ पालकांच्या वाढलेल्या अपेक्षांचीच परिणिती आहे. वारेमाप पैसा ओतूनही जेव्हा ईप्सित साध्य होत नाही तेव्हा अनेक जण डिप्रेशनमध्ये जातात. त्यातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. गेल्या काही वषार्ंतला आकडा जर बघितला तर ’कोटा’मध्ये अनेक मुलांनी आपला जीव केवळ स्वप्नांचा पाठलाग करताना आलेल्या अपयशामुळे दिल्याचे वास्तव आहे. खरेतर कोटा अथवा लातूर येथे शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांचे मोठे स्वप्न असते. त्यासाठी ते धडपडतही असतात. परिस्थितीची जाण ठेवून कष्ट उपसण्याचीही तयारी असते; परंतु असे काही प्रकरणे बाहेर येतात. आणि स्वप्नभंग होतो. आताही परीक्षा दिलेल्या पाल्यांना केवळ काही मंडळींच्या चुकीचा फटका सहन करावा लागला आहे. खरेतर शिक्षणासारखे पवित्र क्षेत्र दुसरे कोणतेच नाही. पण या क्षेत्रातील मंडळींनी सरस्वतीपेक्षा ’लक्ष्मी’पूजनाकडे जास्त लक्ष दिले आहे. ’नीट’ पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत तीन प्राध्यापक जाळ्यात अडकले आहेत. तळे राखी तो पाणी चाखी या वृत्तीप्रमाणे या मंडळींकडे प्रश्नपत्रिका काढण्याची जबाबदारी दिली आणि कुंपणानेच शेत खाल्ले. त्यामुळे आता विश्वास ठेवायचा तरी कुणावर? असा प्रश्न निर्माण होतो. ’नीट’सारख्या परीक्षेसाठी यंत्रणा एवढी काळजी घेत असूनही असले प्रकार घडतात. म्हणून परीक्षा पद्धतीतच आमूलाग्र बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे. सातव्या वेतन आयोगाने प्राध्यापकांचे पगार गलेलठ्ठ झाले आहेत. तरीदेखील पैसा जमा करण्याचा भस्म्या या मंडळींना जडला आहे. त्यात मोटेगावकरसारखे क्लासचालक स्वत:चे साम्राज्य आणि नाव कमावण्यासाठी कितीही पैसा ओतू शकतात, हे या घटनेने सिद्ध झाले आहे. आज शहरातील महाविद्यालयांत शिक्षक शिकविण्यापेक्षा विद्यार्थ्यांना खासगी क्लासेसमध्ये प्रवेश घेण्याचा सल्ला देतात. त्यातून त्यांची मेहनत तर वाचतेच. शिवाय क्लासचालकांकडूनही फायदा होतो. अनेक महाविद्यालयांनी खासगी क्लासेससोबत टायअपचा बिझनेस सुरू केला आहे. क्लासचालकांनीही शहराबाहेर जागा घेऊन स्वत:चेच कॉलेज उभे केले आहेत. विद्यार्थ्यांकडून लाखात फी घ्यायची आणि परीक्षा क्लासमध्येच द्यायची. टायअपच्या या फंड्यामुळे विद्यार्थ्यांची अभ्यासाची सवय मोडीत निघत आहे. क्लासमध्येच प्रश्न आणि उत्तर लिहून देण्याच्या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची वृत्ती नष्ट होत आहे. अशा कॉप्या करून पास होणारे ’मुन्नाभाई एमबीबीएस’च्या गळ्यात स्टेथोस्कोप दिला तर रुग्ण दगावलाच म्हणून समजा! त्यामुळे शिक्षणाचा दर्जा सुधारतोय की, पैशाच्या हव्यासापोटी केवळ कागदोपत्री डॉक्टर तयार होत आहेत, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आज येऊन ठेपली आहे. शिक्षणाने उद्याचा समाज घडतो, देश घडतो, देशाच्या वाटचालीसाठी शिक्षण तितकेच महत्त्वाचे आहे आणि प्रत्येकाला शिक्षण मिळणे हा मूलभूत अधिकार आहे, शिक्षण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासन व्यवस्थेची आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून सरकार ही जबाबदारी टाळत आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्राचे खासगीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे. शिक्षण क्षेत्रात पैसा मिळतो हे लक्षात आल्याने शिक्षणाचा बाजार मांडला गेला आहे. पेपरफुटीच्या अथवा कॉपी प्रकरणच्या आजवर अनेक घटना घडल्या मात्र, कुणाला गंभीर शिक्षा झाल्याचे एकही उदाहरण समोर आलेले नाही. त्यामुळे या मंडळींना ना कायद्याचा धाक उरला आहे, ना शिक्षेची भीती बाळगत आहेत. मोटेगावकर याने तर मागे पेपरफुटीच्या वेळी असे प्रकार करणार्‍यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे आता त्यांनी जे पाप केले त्याला सरकार कोणती शिक्षा देणार? की पैसा आणि मसल पॉवरच्या जोरावर हे प्रकरणही काही दिवसांत पुन्हा शांत होऊन जाईल, याचे उत्तर आगामी काळातच मिळू शकेल.

The name is ‘Mote’; the sign is false!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *