ग्राहकाच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवल्याचा आरोप

सिन्नरला महावितरणविरोधात तक्रार; जुने मीटर पुन्हा बसवण्याची मागणी

सिन्नर : प्रतिनिधी
शहरातील राजा फत्तेसिंग रोड परिसरात ग्राहकाची कोणतीही पूर्वपरवानगी किंवा लेखी संमती न घेता जबरदस्तीने प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी व्यावसायिक अकील अब्बास शेख यांनी महावितरण प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल करत पूर्वीचे डिजिटल मीटर पुन्हा बसवण्याची मागणी केली आहे.
शेख यांच्या दुकानात 26 मे रोजी सकाळच्या सुमारास महावितरणचे वायरमन आणि स्मार्ट मीटर बसविणार्‍या ठेकेदाराच्या कर्मचार्‍यांनी भेट देत कोणतीही पूर्वसूचना न देता जुने डिजिटल मीटर काढून नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर बसविल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मीटर बदलण्यापूर्वी कोणतीही नोटीस, एसएमएस, लेखी आदेश किंवा अधिकृत माहिती देण्यात आली नसल्याने ही कारवाई बेकायदेशीर पद्धतीने करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तक्रारीत विद्युत कायदा 2003 मधील विविध तरतुदींचा उल्लेख करण्यात आला आहे. ग्राहकाला कार्यरत व अचूक मीटर मिळण्याचा अधिकार असल्याचे नमूद करत, सुरू असलेले डिजिटल मीटर बदलण्याची आवश्यकता नव्हती, असा दावा करण्यात आला आहे. तसेच प्रीपेड प्रणाली स्वीकारायची की नाही, हा निर्णय ग्राहकाचा असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, संबंधित ग्राहकाने महावितरण प्रशासनाकडे जुने डिजिटल मीटर तत्काळ पुन्हा बसवावे, संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करावी तसेच मीटर बदलण्याबाबत लेखी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली आहे. तक्रारीसोबत वीज बिलाची प्रत आणि नवीन स्मार्ट मीटरचे छायाचित्रही जोडण्यात आले आहे.

दोन्ही मीटर रेफरन्ससाठी ठेवणार
स्मार्ट मीटर ही काळाची गरज आहे. सर्व ग्राहकांकडे टप्प्याटप्प्याने स्मार्ट मीटर बसवले जाणार आहेत. स्मार्ट मीटर आणि जुन्या मीटरमधील रीडिंग किंवा देयकात तफावत आढळल्यास दोन्ही मीटर रेफरन्स म्हणून ठेवण्यात येतील, अशी माहिती उपकार्यकारी अभियंता हेमंत बनसोडे यांनी दिली.

Allegation of installing smart meters without customer’s permission

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *