सिंहस्थ कामांवर पावसाळ्यापूर्वी सुरक्षा उपाययोजना बंधनकारक

31 मेपर्यंत पूर्ण करण्याचे कुंभमेळा प्राधिकरणाचे आदेश

नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळा-2027 च्या पाश्वर्र्भूमीवर सुरू असलेल्या सर्व विकासकामांमध्ये पावसाळ्यापूर्वी आवश्यक सुरक्षा उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने दिले आहेत.
प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी या संदर्भातील पत्रक जारी करून सर्व विभाग, कंत्राटदार आणि कार्यान्वयन यंत्रणांना 31 मे 2026 पर्यंत उपाययोजना पूर्ण करून छायाचित्रांसह अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
कुंभमेळ्याच्या तयारीअंतर्गत नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरात रस्ते, ड्रेनेज, घाट, पाणीपुरवठा आणि विविध नागरी सुविधा विकासाची कामे सुरू आहेत. पावसाळ्यात नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्था अबाधित राहावी, यासाठी हे निर्देश देण्यात आले आहेत.
पत्रकानुसार बांधकाम साहित्य, माती, स्क्रॅप व ढिगारे तातडीने हटविणे किंवा सुरक्षित साठवणे आवश्यक राहील. खोदकाम आणि ट्रेंचिंग भागांभोवती मजबूत बॅरिकेडिंग, रेट्रो-रिफ्लेक्टिव्ह टेप्स, साइनबोर्ड आणि प्रकाशयोजना करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नाले, वाहिन्या आणि क्रॉस ड्रेनेज व्यवस्था तातडीने स्वच्छ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पूरप्रवण भागांत उच्च क्षमतेचे डी-वॉटरिंग पंप सज्ज ठेवण्याबरोबरच प्रत्येक कंत्राटदाराने पूरस्थिती समन्वयासाठी स्वतंत्र नोडल अधिकार्‍याची नियुक्ती करणे आवश्यक केले आहे. सर्व विद्युत यंत्रणा आणि वायरिंग पाण्यापासून सुरक्षित ठेवण्याचे आदेशही दिले आहेत.
आयुक्त शेखर सिंह यांनी विकासकामांच्या ठिकाणी पावसाळ्यात नागरिकांच्या सुरक्षिततेला कोणताही धोका निर्माण होणार नाही, यासाठी सर्व यंत्रणांनी दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत.

ठळक निर्देश
31 मे 2026 पर्यंत सर्व सुरक्षा उपाययोजना पूर्ण करणे बंधनकारक.
खोदकाम भागांभोवती बॅरिकेडिंग व प्रकाशयोजना आवश्यक.
रस्ते, दुभाजक व नाल्यांमधील माती, कचरा हटविण्याचे आदेश.
पूरप्रवण भागांत डी-वॉटरिंग पंप सज्ज ठेवण्याच्या सूचना.

अनुपालन अहवाल अनिवार्य
प्रत्येक विभाग, कंत्राटदार व कार्यान्वयन यंत्रणेला केलेल्या उपाययोजनांचा छायाचित्रांसह अनुपालन अहवाल 31 मेपूर्वी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाकडे सादर करावा लागणार आहे. आपत्कालीन प्रतिसाद वाहन, पर्यवेक्षक आणि नोडल अधिकारी नियुक्त ठेवणेही बंधनकारक केले आहे.

Safety measures mandatory for Simhastha works before monsoon

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *