धूर दिसला अन् जीव वाचले
चांदवड : वार्ताहर
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील रेणुकादेवी मंदिर घाट उतरून चांदवड येथील खोकड तलावासमोरील निसर्ग लॉन्सजवळ मंगळवारी (दि. 2) दुपारी पावणेदोनच्या सुमारास शहादा-नाशिक एसटी बसला भीषण आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण बस ज्वाळांच्या विळख्यात सापडली. मात्र, बसमधील महिला प्रवाशाच्या सतर्कतेमुळे तसेच चालक आणि वाहकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील 54 प्रवाशांचे प्राण सुदैवाने वाचले.
मिळालेल्या माहितीनुसार, शहादा आगाराची शहादा-नाशिक एसटी बस (एमएच-15/जेडब्ल्यू-0895) सकाळी सव्वाआठला शहादा येथून नाशिककडे रवाना झाली होती. बस रेणुकादेवी घाट उतरून खोकड तलाव परिसरात पोहोचली असता गिअर बॉक्सजवळ शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचे प्राथमिक कारण समोर आले आहे. बसमधील एका महिला प्रवाशाच्या धूर आणि उष्णता आल्याने लक्षात आले. त्यांनी तत्काळ वाहक सचिन ननावरे यांना माहिती दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालक गोविंद पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता बस रस्त्याच्या कडेला सुरक्षितपणे उभी केली. त्यानंतर प्रवाशांना तातडीने खाली उतरविण्यात आले. बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. मात्र चालक आणि वाहक यांच्या सूचनांनुसार सर्व प्रवासी सुरक्षितपणे खाली उतरले. प्रवासी खाली उतरत असतानाच आगीने रौद्र रूप धारण केले आणि काही मिनिटांतच संपूर्ण बस ज्वाळांच्या भक्ष्यस्थानी पडली.
घटनेची माहिती मिळताच चांदवड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत बस पूर्णपणे जळून बेचिराख झाली होती. निसर्ग लॉन्ससमोर रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक एकाच मार्गाने सुरू होती. त्यामुळे बसला आग लागल्यानंतर महामार्गाच्या दोन्ही बाजूंना सुमारे तासभर वाहतुकीची कोंडी झाली होती. दरम्यान, चांदवड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मोरे, भाऊसाहेब गुळे, हवालदार सुळ, स्वप्नील जाधव यांच्यासह पोलिस कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले व वाहतूक सुरळीत केली. जळीतग्रस्त बसमधील सर्व प्रवाशांना दुसर्या बसद्वारे पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले. चांदवड पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
विद्यार्थिनीचे शैक्षणिक साहित्य खाक
या बसमधून प्रवास करणारी दोंडाईचा येथील कृषी शिक्षण घेणारी विद्यार्थिनी वैष्णवी सुनील जाधव हिच्या दोन बॅगा बसच्या टपावर (वरच्या भागात) राहून गेल्या. या बॅगांमधील कपडे, महत्त्वाचे शैक्षणिक साहित्य तसेच कृषी शिक्षणाच्या नोट्स आगीत जळून खाक झाल्या. वैष्णवीसह अन्य काही प्रवाशांच्या सामानाचेही या आगीत मोठे नुकसान झाले.
Lalpari train capsizes near Chandwad, 54 passengers rescued