कुंभमेळ्यासाठी 4,500 बसेसचे नियोजन

दररोज 33 लाखांहून अधिक भाविकांच्या वाहतुकीची क्षमता

असे आहे नियोजन

एकूण बसेस : 4,500, रस्ते मार्गासाठी : 3000 बसेस, रेल्वे प्रवाशांसाठी : 1500 बसेस, दररोज वाहतूक क्षमता : 33 लाखांहून अधिक प्रवासी, बाह्य वाहनतळ : 46, रेल्वेस्थानके : 05

अमृतस्नानासाठी विशेष नियोजन

* खासगी वाहनांना बाह्य वाहनतळापर्यंतच प्रवेश.
* पुढील प्रवासासाठी एसटीच्या विशेष बसेस.
* रामकुंड व त्र्यंबकेश्वर परिसरात पायी मार्गांना प्राधान्य.
* बसेसवर जीपीएस व उपग्रह आधारित नियंत्रण.
* एकात्मिक नियंत्रण कक्षातून गर्दी व्यवस्थापन.
* अतिरिक्त बसेस राखीव ठेवण्याची व्यवस्था.

नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळा-2027 दरम्यान नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे येणार्‍या कोट्यवधी भाविकांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि नियोजनबद्ध करण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने व्यापक सार्वजनिक वाहतूक आराखडा तयार केला आहे. या आराखड्यांतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून 4,500 बसेसची व्यवस्था करण्यात येणार आहे. दररोज 33 लाखांहून अधिक भाविकांची वाहतूक आराखड्यांतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून 4,500 बसेसची व्यवस्था करण्यात येणार आहे. दररोज 33 लाखांहून अधिक भाविकांची वाहतूक करण्याची क्षमता विकसित केली जाणार आहे.
कुंभमेळ्यातील गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन आणि भाविकांना अखंडित प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रस्ते व रेल्वेमार्गाने येणार्‍या प्रवाशांसाठी स्वतंत्र बस व्यवस्थेचे नियोजन केले आहे. यात 3000 बसेस रस्तेमार्गाने येणार्‍या भाविकांसाठी, तर 1500 बसेस रेल्वेने येणार्‍या प्रवाशांसाठी
उपलब्ध राहतील.
रस्ते मार्गाने येणार्‍या भाविकांसाठी 46 बाह्य वाहनतळांपासून नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील प्रमुख धार्मिक स्थळांपर्यंत विशेष बससेवा चालविण्यात येणार आहे. यात नाशिकमधील बाह्य वाहनतळ ते अंतर्गत भागासाठी 900 बस, नाशिक ते त्र्यंबकेश्वर मार्गासाठी 1,485 बस आणि त्र्यंबकेश्वरमधील अंतर्गत वाहतुकीसाठी 325 बसेस कार्यरत राहतील. याशिवाय, 290 बस राखीव ठेवण्यात येणार आहेत. या व्यवस्थेद्वारे दररोज सुमारे 25.36 लाख भाविकांची वाहतूक
करता येईल.
रेल्वेने येणार्‍या भाविकांसाठीही स्वतंत्र वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे. नाशिकरोड, देवळाली, ओढा, खेरवाडी आणि कसबे सुकेणे या पाच रेल्वे स्थानकांना बससेवेशी जोडण्यात येणार आहे. यासाठी 1500 बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. त्यांपैकी 520 बसेस रेल्वेस्थानक ते अंतर्गत वाहनतळ आणि 680 बसेस रेल्वेस्थानक ते त्र्यंबकेश्वर मार्गावर धावतील. अतिरिक्त गर्दीच्या काळात वापरण्यासाठी 300 बसेस राखीव ठेवण्यात येतील. या व्यवस्थेमुळे दररोज सुमारे 8.26 लाख रेल्वे प्रवाशांची वाहतूक शक्य होणार आहे. अमृतस्नानाच्या प्रमुख पर्वणीच्या दिवशी होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन खासगी वाहनांना निश्चित केलेल्या बाह्य वाहनतळांपर्यंतच प्रवेश दिला जाणार आहे. त्यानंतर भाविकांना राज्य परिवहन महामंडळाच्या विशेष बसद्वारे रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर परिसरात पोहोचविण्यात येईल. धार्मिक स्थळांच्या परिसरात पायी वाहतुकीला प्राधान्य दिले जाणार आहे. संपूर्ण बसव्यवस्थेवर उपग्रह आधारित यंत्रणेद्वारे देखरेख ठेवली जाणार आहे. ती एकात्मिक नियंत्रण कक्षाशी जोडण्यात येणार आहे. त्यामुळे बसेसची उपलब्धता, फेर्‍यांचे नियोजन, प्रतीक्षा कालावधी आणि गर्दीचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.

अमृतस्नानाच्या दिवशी नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर सर्वाधिक गर्दी अपेक्षित असल्याने त्यासाठी विशेष नियोजन केले आहे. रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून संपूर्ण वाहतूक व्यवस्था कार्यान्वित केली जाणार आहे.
– किरण भोसले, विभागीय वाहतूक अधिकारी, राज्य मार्ग परिवहन महामंडळ

देशभरातून येणार्‍या भाविकांचा प्रवासाचा टप्पा अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि नियोजनबद्ध व्हावा, यासाठी विशेष वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणावरील गर्दीचे व्यवस्थापन व भाविकांसाठी सुविधा, हेच या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
– शेखर सिंह, कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त

 

4,500 buses planned for Kumbh Mela

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *