स्थलांतरित केलेल्या पंचायत समितीचा त्रिस्थळी कारभार

हक्काच्या मूलभूत सुविधांसाठी ग्रामीण भागाची परवड

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
त्र्यंबक पंचायत समितीच्या स्थलांतरित कार्यालयाचा कारभार अंजनेरी तळवाडे येथून सुरू करण्यात आला आहे. मुख्यालय त्र्यंबकेश्वर असताना येथे कार्यालयाला जागा मिळवून देण्यास लोकप्रतिनिधी कमी पडले असल्याची भावना जनमानसात व्यक्त होत आहे. तालुक्यातील 125 गावांची 2 लाख 50 हजार जनतेची मूलभूत हक्कांची कामे करण्यासाठी त्यांना त्रिस्थळी यात्रा कारावी लागणार आहे.
त्र्यंबकेश्वर पंचायत समिती कार्यालय सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयेजनासाठी तातडीने स्थलांतरित केले असून, विविध विभागांच्या मुख्यालयांना एका छताखाली जागा मिळालेली नाही. आजच्या घडीला पंचायत समिती कार्यालय अंजनेरी येथील ट्रेकिंग हबच्या इमारतीत हलवण्यात आले. मात्र, सर्व विभागांना तेथे जागा नसल्याने केवळ ग्रामपंचायत विभाग तेथे बसविण्यात
आला आहे.
तेथून काही अंतर असलेल्या अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात तालुका आरोग्य विभागाला कार्यालय देण्यात आले. शिक्षण विभागाला तेथून पाच किमी अंतरावर तळवाडे येथे जिल्हा परिषद शाळेच्या जागेत बांधलेल्या गट साधन केंद्राच्या इमारतीत जागा मिळाली आहे. त्या इमारतीच्या उरल्यासुरल्या भागात ग्रामीण पाणीपुरवठा पाहुणा म्हणून आला आहे. अद्याप बांधकाम विभाग, बालविकास प्रकल्प विभागाच्या बाबत अनभिज्ञता आहे. पशुसंवर्धन, कृषी विभाग, समाजकल्याण यांची परवड आणखी वेगळी आहे.
तालुका निर्मिती 26 जून 1999 रोजी झाली. त्यानंतर पहिली पंचायत समिती 14 मार्च 2002 रोजी अस्तित्वात आली. तहसील कार्यालयाची स्वतंत्र इमारत झाली तेव्हापासून पंचायत समितीला जागा शोधण्याचे काम सुरू झाले. दोन वर्षांपूर्वी तहसील कार्यालयाच्या लगतच्या जिल्हा परिषदेच्या जागेत पंचायत समिती कार्यालयाचे भूमिपूजन झाले. सर्व सुविधांनीयुक्त अशी 15 कोटींची इमारत बांधण्यात येणार असे फलक लागले. मात्र, या जागेपासून दर्शनपथ होणार म्हणून कार्यालयाचे काम रखडले.

तळवाडे येथे जाण्याची वेळ

सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर आला, तसे कुंभमेळा प्राधिकरणाने तगादा लावून पंचाायत समिती कार्यालयाची जागा खाली करून घेतली. त्यासाठी पर्यायी इमारत नसल्याने अंजनेरी येथील ट्रेकिंग हब इमारत देण्यात आली. त्या अपुर्‍या जागेत गटविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत विभाग थाटण्यात आला आहे. शिक्षण विभागाला तेथून 5 किमी अंतरावर तळवाडे येथे जाण्याची वेळ आली, तर त्याच जागेत पाणीपुरवठा विभाग कसाबसा सुरू झाला आहे. पंचायत समितीच्या संबंधित कामासाठी पदरमोड करत 5 ते 10 किमी अंतर प्रवास करावा लागणार आहे.

पाणीटंचाईची परिसीमा

ग्रामीण भागातून घरकुलाचे लाभार्थी येतात. पाणीपुरवठा, बांधकाम, अंगणवाडी, कृषी, आरोग्य यांसह सर्व लाभाच्या योजनांसाठी हेलपाटे मारावे लागतात. शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत असताना, ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना होणारी पायपीट त्रासदायक ठरते आहे. पाणीटंचाईने परिसीमा गाठली आहे. पाऊस सुरू होत असताना घरकुलाचे लाभार्थी शासनाच्या दिरंगाईच्या कारभाराने हवालदिल झाले आहेत. कुंभमेळ्याचे आयोजन करताना शासनाला तालुक्यातील अडीच लाख जनतेचा विसर पडला आहे. यापुढे त्र्यंबकेश्वर येथील उपजिल्हा रुग्णालय स्थलांतरित केल्यास सर्वसामान्यांचे हाल होतील याचे भान शासनाने ठेवावे, असे मत जनतेतून व्यक्त होत आहे.

Three-tier governance of the relocated Panchayat Samiti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *