घोटी : प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील खैरगाव शिवारात मोराच्या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात गावठी दारू बनवत असल्याची गुप्त माहिती घोटीचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी पोलीस पथकासह या जंगलात पोहोचले असता, पोलिसांची चाहूल लागताच दारू बनवणार्यांनी जंगलात धूम ठोकली. पोलिसांनी डोंगराच्या पायथ्याशी छापा टाकून गावठी दारूसाठी लागणारे 1 लाख 30 हजार रुपये किमतीचे गूळ व नवसागर रसायन मिस्त्रीत पाणी जागेवरच नष्ट केले, तसेच 6 हजार पाचशे रुपये किमतीचे प्लास्टिकचे 13 ड्रम, 13 हजार रुपये किमतीचे 13 लोखंडी ड्रम, 2 हजार रुपये किमतीचे लाकूड, 3 हजार पाचशे रुपये किमतीची सफेद ड्रममधील तयार गावठी दारू अशी 1 लाख 55 हजार रुपये किमतीचा विनापरवाना बेकायदेशीर मुद्देमाल जप्त करून नष्ट केला. या कारवाईत गावठी दारू बनवणारा संशयित वामन कोंडाजी आघाण (रा. खैरगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण उदे, हवालदार लक्ष्मण धकाते, परीक्षित इंगळे, सतीश चव्हाण, नितीन कटारे यांनी केली. कारवाईदरम्यान पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून गेले. या कारवाईमुळे गावठी दारू बनवणार्यांचे धाबे दणाणले आहे.
Village liquor den demolished in Khairgaon Shivara