चांडक कन्या विद्यालयाच्या आवारात पाच तास थरार
सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर शहराच्या मध्यवर्ती भागात गुरुवारी बिबट्याचा बछडा आढळल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. नगर परिषदेलगत असलेल्या मातोश्री चांडक कन्या विद्यालयाच्या आवारातील झाडीत हा बछडा लपून बसल्याचे आढळून आले. माहिती मिळताच वनविभागाने तातडीने बचाव मोहीम सुरू केली. तब्बल पाच तास चाललेल्या रेस्क्यू ऑपरेशननंतर नाशिकहून आलेल्या विशेष पथकाने डार्ट मारून बछड्याला बेशुद्ध केले आणि सुरक्षितपणे ताब्यात घेतले.
दुपारी सव्वादोनच्या सुमारास विद्यालयातील आयटीआय विभागातील शिपाई गुरव यांना बिबट्याचा बछडा दिसला. त्यांनी शिक्षकांना माहिती दिल्यानंतर परिसराची पाहणी करण्यात आली. तोपर्यंत बछडा शाळेच्या आवारातील बगिच्यातील दाट झाडीत दडून बसला होता. तत्काळ पोलिसांना आणि वनविभागाला माहिती
देण्यात आली.
वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बछड्याचा अंदाज घेऊन परिसर सुरक्षित करण्यात आला. दरम्यान, बिबट्या असल्याची माहिती शहरभर पसरताच शेकडो नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. चांडक कन्या विद्यालय आणि शेजारील सारडा विद्यालयाचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले. मात्र, भिंतींवर चढून बिबट्याला पाहण्याचा प्रयत्न करणार्या बघ्यांमुळे बचाव कार्यात अडथळे निर्माण झाले.
सायंकाळी चारच्या सुमारास नाशिक येथील विशेष बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. स्थानिक वनकर्मचार्यांनी आधीच जाळ्या उभारून परिसर संरक्षित केला होता. त्यानंतर बछड्याची अचूक जागा निश्चित करून त्याला डार्ट मारण्याची मोहीम सुरू झाली. पहिला प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर दुसर्या प्रयत्नात यश मिळाले. सायंकाळी सातच्या सुमारास बछडा बेशुद्ध होताच पथकाने त्याला सुरक्षितरीत्या पकडले. पकडण्यात आलेल्या बछड्याला प्रथम मोहदरी वनोद्यानात तपासणीसाठी नेण्यात आले. त्यानंतर पुढील उपचार आणि निगेसाठी नाशिक येथील सीटीसी सेंटरमध्ये हलविण्यात आले. हा बछडा अंदाजे पाच महिन्यांचा असल्याचे वनविभागाने सांगितले.
मध्यवस्तीत बिबट्या पोहोचल्याने प्रश्नचिन्ह
नगरपरिषद, हुतात्मा चौक, पोलीस ठाणे, ग्रामीण रुग्णालय आणि अन्य शासकीय कार्यालयांनी वेढलेल्या परिसरात बिबट्याचा बछडा कसा पोहोचला, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. शाळेचा परिसर चारही बाजूंनी संरक्षक भिंतींनी बंदिस्त असतानाही हा बछडा आत कसा शिरला, याचा शोध वनविभाग घेत आहे.
अमरधामजवळ दिसलेला तोच बछडा?
काही दिवसांपूर्वी संगमनेर नाका परिसरातील अमरधामजवळ बिबट्याच्या बछड्याचे दर्शन झाले होते. हा तोच बछडा असू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अमरधाम ते चांडक विद्यालय हे अंतर गजबजलेल्या नागरी वस्त्यांतून जात असल्याने बछड्याने हा प्रवास कसा केला, याविषयीही उत्सुकता व्यक्त होत आहे. या घटनेमुळे सिन्नर शहरात बिबट्यांचा वाढता वावर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला असून, नागरिकांमध्ये सावधगिरीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Leopard enters crowded Sinnar settlement