नियमांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी दणका
नाशिक : प्रतिनिधी
शहरात मागील काही दिवसांमध्ये रुग्णालयांचा निर्बंध घातलेल्या प्रकरणात सहभाग आढळून येत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मनपाचा आरोग्य विभाग उशिराने का होईना जागा झाला असून, शहरातल्या 674 रुग्णालयांची तपासणी करण्यासह कागदपत्रांची माहिती घेतली जात आहे. दरम्यान, यातील 21 रुग्णालयांनी नियमांना पाठ दाखवल्याचे समोर आल्याने याप्रकरणी आरोग्य विभाग संबंधित रुग्णालयांना नोटिसा धाडणार आहे. त्यामुळे संबंधित रुग्णालय व्यवस्थापनाचे धाबे दणाणले आहेत.
रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागाने शहरातील रुग्णालयांमधील कागदपत्रांची तपासणी मोहीम मागील महिन्यात राबविली होती. या मोहिमेत या विभागाला 21 रुग्णालयांच्या कागदपत्रांमध्ये अनियमितता आढळून आली असून, याप्रकरणी वैद्यकीय विभाग शुक्रवारी (दि. 12) संबंधित रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावणार आहे. शहरातील मुंबई नाका भागातील मालती आयव्हीएफ सेंटरचा बदलापूर येथील स्त्रीबीज तस्करी प्रकरणात दाट संशय आढळून आल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. तसेच काही रुग्णालयांमध्ये रुग्णांकडून नियमांची पायमल्ली होत असल्याच्या अनेक तक्रारी वैद्यकीय विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. महात्मानगर यासारख्या गजबलेल्या परिसरातील एका रुग्णालयात तर गर्भलिंग निदान चाचण्या करण्याबरोबरच बेकायदेशीरपणे गर्भपातसारखे प्रकार केले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. या सर्व पार्श्वभूमीवर शहरातल्या रुग्णालयांची तपासणी मोहीम हाती घेण्यात
आली होती.
रुग्णांच्या दृष्टीने रुग्णालय व्यवस्थापनाने योग्य ती काळजी घेतली पाहिजे. मात्र, काही रुग्णालयांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. यात प्रारंभी काही रुग्णालयांना अनियमिततेप्रकरणी नोटीस बजावली होती, मात्र संबंधितांकडून योग्य खुलासा सादर न केल्यास संबंधित रुग्णालयांवर कारवाई केली जाईल. प्रसंगी रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याची कारवाई होऊ शकते.
– डॉ. विजय देवकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी, मनपा
Blow to 21 hospitals; Municipal Corporation to issue notices.