नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेचा आकृतिबंध कोणत्या ना कोणत्या कारणांनी गेल्या काही वषार्ंपासून रखडल्याचे चित्र आहे. दरम्यान, नाशिक महापालिकेच्या प्रलंबित विविध सुधारित 8,877 पदांच्या आकृतिबंधास शासनाच्या नगरविकास विभागाची पावसाळी अधिवेशनापूर्वी मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. कारण राज्य शासनाने यासंदर्भात नगरविकास विभागाने महापालिकेकडून पुन्हा एकदा तातडीची बाब म्हणून कार्यरत कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचार्यांची माहिती तातडीने पाठविण्याचे निर्दे-श मनपा प्रशासनाला शुक्रवारी (दि.12) दिले आहेत. त्यानुसार आज, शनिवारी सर्व विभागांना त्यांच्याकडील अद्ययावत माहिती सादर करण्याचे आदेश दिले.
राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन 22 जूनपासून सुरू होत आहे. दरम्यान, गेल्या अधिवेशनात दिलेल्या आश्वासनांची पूर्तीचा आढावा घेतला जात आहे. यात नाशिक महापालिकेच्या आकृतिबंधाचाही समावेश आहे. त्यामुळे आकृतिबंधाला अधिवेशनापूर्वी मंजुरी मिळण्याची शक्यता बळावली आहे. नगरविकास विभागाच्या सूचनांनुसार महापालिकेने आवश्यक त्या त्रुटींची पूर्तता केल्यानंतर आता यासंदर्भातील संचिका अंतिम मंजुरीसाठी मंत्रालयात सचिवांच्या टेबलवर सादर करण्यात आली असून, त्यामुळे आकृतिबंध मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे.
नाशिक महापालिकेचा समावेश ’ब’वर्गीय महापालिकेत असला तरी आस्थापना परिशिष्ट मात्र ’क’वर्गीयच आहे. सद्यःस्थितीत या आस्थापना परिशिष्टावरील 7,725 मंजूर पदांपैकी सुमारे 3,800 पदे सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्तीमुळे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारे काम करताना अडचणी निर्माण होतात. ’ब’वर्गीय आस्थापनेनुसार महापालिकेने सुधारित आकृतिबंध तयार करून शासनाच्या नगरविकास विभागाला सादर केला आहे. आठ वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटल्यानंतरही या आकृतिीबंधाला शासनाची मंजुरी मिळू शकलेली नाही.
शासनाचे महापालिकेला पत्र
प्रलंबित विविध संवर्गांतील 8,877 पदांचा सुधारित आकृतिबंध मंजुरीसाठी राज्य शासनाने पावले उचलली आहेत. या आकृतिबंधातील सर्व त्रुटींची पूर्तता महापालिका प्रशासनाकडून करण्यात आल्यानंतर आता यासंदर्भातील संचिका नगरविकास विभागाच्या सचिवांच्या मंजुरीसाठी आधीच सादर करण्यात आहे. तरीही राज्याच्या नगरविकास विभागाने शुक्रवारी महापालिकेला पत्र पाठवून सद्यःस्थितीत कार्यरत कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी यांची माहिती तातडीची बाब म्हणून शनिवारी (दि. 13) सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
Municipal Corporation’s revised staffing pattern of 8,877 posts to receive approval.