जून अर्धा संपला तरी उन्हाचा तडाखा कायम

मृग नक्षत्र सुरू होऊनही पावसाची प्रतीक्षाच; तापमान 41 अंशांवर स्थिर

मालेगाव : प्रतिनिधी
जून महिन्याचा अर्धा टप्पा पार होत आला असतानाही मालेगाव शहरात उन्हाळ्याची तीव्रता कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. 7 जूनपासून मृग नक्षत्राला प्रारंभ झाला असला तरी अद्याप मान्सूनचे आगमन झाले नाही. गेल्या आठवडाभरापासून शहरातील कमाल तापमान 41 अंशांच्या आसपास स्थिर राहिले आहे. परिणामी, नागरिकांना जून महिन्यातही मे महिन्यासारखाच उकाडा सहन करावा लागत आहे.

हवामान केंद्राच्या नोंदीनुसार 10 ते 16 जून या सात दिवसांच्या कालावधीत कमाल तापमान 40.6 ते 42.8 अंश सेल्सिअसदरम्यान राहिले. 12 जून रोजी सर्वाधिक 42.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर किमान तापमान 25 ते 25.8 अंशांच्या दरम्यान कायम राहिले. विशेष म्हणजे, या संपूर्ण कालावधीत पावसाची एकही नोंद झालेली नाही.
दरवर्षी मृग नक्षत्राच्या प्रारंभानंतर पावसाची चाहूल लागते आणि तापमानात काही प्रमाणात घट जाणवते. मात्र, यंदा मान्सूनच्या आगमनाला विलंब होत असल्याने वातावरणातील उष्णता आणि दमटपणा वाढला आहे. सकाळपासूनच सूर्याची तीव्रता जाणवत असून, दुपारच्या वेळेत रस्त्यांवर वर्दळ कमी होत असल्याचे दिसून येत आहे.
उष्णतेमुळे वृद्ध, लहान मुले तसेच बाहेर काम करणार्‍या कामगारांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे. थंड पेये, उसाचा रस, फळांचे ज्यूस आणि पिण्याच्या पाण्याची मागणी वाढली असून, शहरातील बाजारपेठांमध्ये दुपारच्या सत्रात तुलनेने शांतता दिसून येत आहे. मान्सून सक्रिय झाल्यानंतरच तापमानात लक्षणीय घट होण्याची शक्यता असून, तोपर्यंत उष्णतेचा प्रभाव कायम राहू शकतो. त्यामुळे नागरिकांनी भरपूर पाणी पिणे, दुपारच्या कडक उन्हात अनावश्यक बाहेर पडणे टाळणे आणि आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात येत आहे. मृग नक्षत्र कोरडेच राहिल्याने शेतकर्‍यांसह सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष आता मान्सूनच्या आगमनाकडे लागले असून, तापमानाचा पारा कधी खाली येणार याची प्रतीक्षा मालेगावकरांना लागून
राहिली आहे.

तापमान (सेल्सिअस)
दिनांक        कमाल     किमान
10 जून         41.0        25.6
11 जून         42.2        25.6
12 जून         42.8       25.8.
13 जून         41.0       25.8
14 जून         40.6      25.6
15 जून         40.6      25.4
16 जून         41.8      25.0

Even though half of June has passed, the scorching heat persists.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *