मानसिक आजार कुटुंबाच्या भावना आणि पुनर्वसन

अभिव्यक्त भावना म्हणजे मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तीबद्दल काळजीवाहक किंवा कुटुंबीयांकडून व्यक्त केल्या जाणार्‍या भावना, दृष्टिकोन आणि वागणूक. कुटुंबातील वातावरणाची गुणवत्ता, नातेवाइकांची टिप्पणी, त्यांचा दृष्टिकोन आणि संवादाची पद्धत यांमधून अभिव्यक्त भावना प्रतिबिंबित होत असतात.
वैज्ञानिक अभ्यासांमधून असे दिसून आले आहे की, नैराश्य, बायपोलर डिसऑर्डर, स्किझोफ्रेनिया, ऑब्सेसिव्ह-कंपल्सिव्ह डिसऑर्डर, तसेच इटिंग डिसॉर्डर्स यांसारख्या मानसिक आजारांमध्ये रुग्णाचा उपचारांना मिळणारा प्रतिसाद आणि आजाराचा एकूण प्रवास हा मोठ्या प्रमाणात कौटुंबिक वातावरणावर अवलंबून असतो. सकारात्मक आणि सहकार्यपूर्ण वातावरण उपचारांना पूरक ठरते, तर नकारात्मक भावनिक वातावरणामुळे आजाराच्या पुनरावृत्तीचा धोका वाढू शकतो.
गुणसूत्रे, पर्यावरण आणि मानसिक आरोग्य :
गुणसूत्रांचा परिणाम आणि मानसिक आजार होण्याची शक्यता, यासाठी पर्यावरण, विशेषतः कौटुंबिक वातावरण महत्त्वाची भूमिका बजावते. काही व्यक्तींच्या गुणसूत्रांमध्ये मानसिक आजार होण्याची शक्यता वाढलेली असू शकते. अशा परिस्थितीत कुटुंबीयांचा दृष्टिकोन आणि भावनिक वातावरण हे रुग्णाच्या आरोग्यावर महत्त्वपूर्ण परिणाम करतात.
सांस्कृतिक संदर्भाचे महत्त्व :
अभिव्यक्त भावना आणि त्यांचा परिणाम हा प्रत्येक समाजातील सांस्कृतिक मूल्ये, परंपरा आणि वर्तनपद्धतींवरही अवलंबून असतो. रुग्णाची काळजी घेण्याची आणि रुग्णाने ती स्वीकारण्याची प्रक्रिया या सांस्कृतिक घटकांमुळे प्रभावित होत असते. त्यामुळे मानसिक आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिकांनी विविध समाजघटकांमधील सांस्कृतिक भिन्नता लक्षात घेऊन उपचार आणि समुपदेशन करणे आवश्यक आहे.
अभिव्यक्त भावना ही केवळ मानसिक आजारापुरती मर्यादित नसून, सर्व दीर्घकालीन आजारांच्या व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावते. योग्य संवाद, सहानुभूती, आपुलकी आणि सकारात्मक कौटुंबिक वातावरण यांमुळे रुग्णाच्या पुनर्वसनास चालना मिळते, आजाराच्या पुनरावृत्तीचा धोका कमी होतो आणि रुग्णाला अधिक चांगले व गुणवत्तापूर्ण जीवन जगण्यास मदत होते. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाइकांनी आपल्या डॉक्टरांकडून, विशेषतः मानसोपचारतज्ज्ञांकडून, अभिव्यक्त भावनांबाबत योग्य मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.

अभिव्यक्त भावनांचे पाच महत्त्वाचे प्रकार
1. टीकात्मक टिप्पणी
रुग्णाशी संवाद साधताना केवळ काय बोलले जाते हेच नव्हे, तर ते कशा पद्धतीने बोलले जाते हेदेखील महत्त्वाचे असते. रागाने बोलणे, आवाजाचा कठोर टोन, चेहर्‍यावरील नाराजी, देहबोली, इतरांसमोर केलेली टीका किंवा सतत इतरांशी तुलना करणे, यामुळे रुग्ण उपचारांपासून दूर जाण्याची शक्यता वाढते.
2. शत्रुत्वाची भावना
रुग्णाशी उद्धटपणे वागणे, वारंवार राग व्यक्त करणे, अपमानास्पद शब्द वापरणे किंवा त्याला नाकारल्यासारखी वागणूक देणे, यामुळे रुग्णाचा मानसिक ताण वाढतो. अशा वातावरणामुळे उपचारांमधील सहभाग कमी होऊन आजार बळावण्याची शक्यता वाढते.
3. अति भावनिक गुंतवणूक
काही वेळा काळजीवाहक व्यक्ती रुग्णासाठी स्वतःच्या आणि इतर कुटुंबीयांच्या गरजांकडे दुर्लक्ष करतात. सतत अपराधीपणाची भावना बाळगतात किंवा अतिसंरक्षणात्मक भूमिका घेतात. त्यामुळे काळजीवाहकांवर ताण वाढतो, तर रुग्णामध्येही अपराधीपणाची भावना निर्माण होऊ शकते. दीर्घकालीन दृष्टीने रुग्णामध्ये स्वावलंबन विकसित होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो.
4. आपुलकी
आपुलकी ही सकारात्मक अभिव्यक्त भावना मानली जाते. रुग्णाप्रति सहानुभूती, काळजी, समजूतदारपणा आणि सौजन्यपूर्ण संवाद यांमुळे उपचारांचा परिणाम अधिक चांगला होण्यास मदत होते.
5. सकारात्मक आदरभाव
रुग्णाच्या छोट्या-छोट्या प्रयत्नांचे कौतुक करणे, त्याच्या आजाराचा स्वीकार करणे, त्याला भावनिक आधार देणे आणि त्याच्या सकारात्मक वागणुकीला प्रोत्साहन देणे यामुळे रुग्णामध्ये आत्मविश्वास वाढतो. शाब्दिक आणि अशाब्दिक संवादातून मिळणारा आधार रुग्णाच्या दैनंदिन कार्यक्षमतेत आणि जीवनमानात सुधारणा घडवून आणतो.

Mental Illness: Family Emotions and Rehabilitation

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *