राजकीय नेते, कार्यकर्त्यांबरोबरच उमेदवारांचीही धावपळ
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी झालेल्या मतदानादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विविध राजकीय घडामोडींना वेग आला. महायुतीचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी तब्बल तीन तास जिल्हाधिकारी कार्यालयात तळ ठोकून मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवले, तर महायुती आणि विरोधकांच्या हालचालींमुळे दिवसभर राजकीय चर्चांना उधाण आले. दरम्यान, दुपारी बारा वाजेपर्यंत एकही नगरसेवक मतदानासाठी दाखल झाले नसल्याचे चित्र होते. त्यामुळे नाशिक मतदान केंद्रावर पहिल्या चार तासांत शून्य टक्के मतदान झाले, तर दोन वाजेपर्यंत 33 जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर उर्वरित दोन तासांत 112 जणांनी मतदानाचा हक्क बजावत नाशिक केंद्रावर शंभर टक्के मतदान झाले.
दुपारी दीडच्या सुमारास मंत्री गिरीश महाजन यांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाला. त्यांच्यासोबत सहलीवरून परतलेल्या नगरसेवकांच्या बसही मतदानासाठी आल्या. सर्वप्रथम भगूर नगरपालिकेच्या नगरसेवकांची बस पोहोचली. त्यानंतर नाशिक महापालिकेतील भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी मतदानासाठी हजेरी लावली. यावेळी महायुतीचा विजय असो, अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला. मतदान शंभर टक्के व्हावे, यासाठी महाजन स्वतः तीन तास तळ
ठोकून होते.
दराडेंची महाजनांशी कुजबुज

महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे दुपारी अडीचच्या सुमारास मतदान केंद्रावर दाखल झाले. नगरसेवकांशी संवाद साधत असतानाच महाजन परिसरात असल्याचे समजताच त्यांनी त्यांची भेट घेत कानात काही वेळ कुजबुज केली. त्यामुळे दोघांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याची उत्सुकता उपस्थितांमध्ये होती.
गिते म्हणाले, दराडेंनाच मतदान करा : मंत्री महाजन
निवडणुकीत मतदान कोणाला करावे, यावरून दोन गट पडल्याचे बालले जात असल्याने यावर बोलताना महाजन म्हणाले, गोकुळ गिते यांच्याशी सकाळी फोनवरून चर्चा झाली. त्यांनी सांगितले, मला मतदान करू नका. मी उमेदवार नाही. नरेंद्र दराडे यांना मतदान करा. त्यामुळे इथे कुठलाही प्रश्न शिल्लक राहिलेला नाही, असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले. निवडणूक कुठलीही असली तरी आम्ही गांभीर्याने घेतो. कुठल्याही निवडणुकीत थोडीशी ढील देत नाही. निवडणूक छोटी असो वा मोठी, शेवटी कार्यकर्त्यांसाठी आम्हाला यावे लागेल. कार्यकर्ते आमच्यासाठी मेहनत घेतात, त्यांना कसे वार्यावर सोडायचे? आमच्याकडे ही पद्धत नाही. ज्यांच्याकडे ही पद्धत आहे, त्यांची काय अवस्था झाली हे आपण पाहत आहात, असे गिरीश महाजन म्हणाले. 470 पेक्षा अधिक मते महायुतीच्या उमेदवाराला मिळतील, असा विश्वासही महाजन यांनी व्यक्त केला.
अन् महापौर धावल्या नगरसेविकांच्या मदतीला

मतदान केंद्रात मोबाइल आणि पर्स नेण्यास बंदी असल्याने अनेक महिला नगरसेविकांनी आपल्या पर्स व मोबाइल महापौर हिमगौरी आडके यांच्याकडे सुपूर्द केल्या. त्यामुळे महापौरांच्या हातात तब्बल दहा ते बारा पर्स दिसून आल्या. महिला सहकार्यांच्या मदतीला धावून आलेल्या महापौरांची ही भूमिका चर्चेचा
विषय ठरली.
Minister Girish Mahajan camping on-site