उसनवार दिलेल्या अवघ्या नऊ हजारांसाठी युवकाची हत्या

कामगारनगरमधील खुनाचे गूढ उकलले; संशयित ताब्यात

सिडको/सातपूर : प्रतिनिधी
सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामगारनगर परिसरातील बेपत्ता युवकाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सातपूर पोलिसांनी अवघ्या 12 तासांत या खुनाचा छडा लावत संशयिताला नाशिकरोड रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतले. उसनवारीने दिलेल्या पैशांच्या वादातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
वैष्णव मिलिंद शिंदे (वय 24, रा. कामगारनगर, सातपूर) हा युवक बेपत्ता असल्याची तक्रार 20 जून रोजी सातपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्याचा शोध सुरू असतानाच 21 जून रोजी कामगारनगर येथील एका इमारतीच्या टेरेसवर कुजलेल्या अवस्थेतील एक मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असता तो मृतदेह वैष्णव शिंदे याचाच असल्याचे निष्पन्न झाले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) सचिन खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. सातपूर पोलिसांचे गुन्हे शोध पथक आणि गुन्हे शाखा युनिट-2च्या पथकाने समांतर तपास सुरू केला. स्थानिक बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी कृष्णा राकेश दुसाने (वय 19, रा. कामगारनगर, सातपूर) याच्यावर संशय व्यक्त केला. आरोपी मुंबईकडे पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर नाशिकरोड रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने वैष्णव शिंदे याला उसनवारीने नऊ हजार रुपये दिले होते. पैसे परत मागितल्यानंतर दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. त्याच रागातून 19 जूनच्या मध्यरात्री आरोपीने धारदार चाकूने छाती आणि गळ्यावर वार करून वैष्णवची हत्या केल्याची कबुली दिली. हत्येनंतर आरोपीने मृतदेह पोत्यात भरून ठेवला होता. दोन दिवस मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्नही त्याने केला. मात्र दुर्गंधी पसरू लागल्याने हा प्रकार स्थानिकांच्या निदर्शनास आला आणि प्रकरण उघडकीस आले. या गुन्ह्याचा छडा लावण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल आहेर, पोलीस हवालदार दीपक खरपडे, तुषार देसले, सचिन सुपले, किशोर बेंडकुळे तसेच पोलीस अंमलदार सोनू खाडे, सागर गुंजाळ, सचिन आजबे, अमोल मोरे, संजय दराडे, पारस देशमुख, योगेश्वर गायकवाड, रवींद्र जाधव, रोहीदास कनोजे, सानिल शिरसाठ आणि गोकुळ वाबळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच गुन्हेशाखा युनिट-2चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर व त्यांच्या पथकानेही तपासात सहकार्य केले.
या प्रकरणाचा पुढील तपास सातपीर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे करीत आहेत.

Youth murdered over a loan of just nine thousand rupees.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *