सहा पथकांवर जबाबदरी
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत शहरातील संशयास्पद वाटणार्या 18 हजार 268 दाखल्यांची छाननी मंगळ्वारी पासून (दि. 23) होणार आहे. दरम्यान, याकरिता प्रशासनाने सहा पथकांवर याची जबाबदारी सोपवली आहे. महिनाभरात सदर काम मार्गी लावले जाणार आहे.
छाननीदरम्यान संशयास्पद बाब, बनावट कागदपत्रे किंवा नियमबाह्य दुरुस्ती आढळल्यास, त्याची स्वतंत्र नोंद घेतली जाणार आहे. ही सर्व पथके पुढील महिनाभरात आपला सविस्तर चौकशी अहवाल थेट मनपा आयुक्तांकडे सादर करणार आहेत. प्राथमिक माहितीनुसार, या चौकशीत गंभीर अनियमितता किंवा बनावटगिरी आढळून आल्यास ती संबंधित प्रकरणे पुढील कडक कारवाईसाठी थेट पोलिसांकडे सोपवली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. महापालिकेच्या प्राथमिक नोंदीनुसार, शहरातील पूर्व आणि नाशिकरोड विभागामध्ये सर्वाधिक दुरुस्त्या झाल्याचे समोर आले आहे. त्यात नाशिकरोड विभागात चार हजार 656 पूर्वत 4 हजार 554, पंचवटी 2 हजार 322, नवीन नाशिक 1 हजार 396, सातपूर 1 हजार 291, व इतर विभाग 3 हजार 549 दाखल्यांचा त्यात समावेश आहे.
या तपासणीसाठी महापालिकेने सहा विशेष पथके नियुक्त केली. सोमवारीच त्यांना यासंदर्भात मार्गदर्शक सूचना व आदेश देण्यात आले आहेत. महापालिकेच्या जन्म-मृत्यू दाखल्यांत गेल्या काही काळात झालेल्या मोठ्या प्रमाणातील दुरुस्त्यांच्या पार्श्वभूमीवर चौकशीला वेग आला आहे. वैद्यकीय विभागाने गठित केलेल्या या सहा विशेष चौकशी पथकांमध्ये विभागीय अधिकारी, विभागीय वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि बहुउद्देशीय सेवकांचा समावेश आहे. हे प्रत्येक पथक आपापल्या विभागातील दाखल्यांमधील दुरुस्त्यांची बारकाईने पडताळणी करणार आहे.
नावातील बदलामागील कारणे शोधली जाणार
नाव, आडनाव, जन्मतारीख किंवा इतर तपशिलांमध्ये झालेल्या बदलांमागील नेमकी कारणे आणि त्यासाठी अवलंबलेली प्रक्रिया कायदेशीर होती की नाही, याची कसून चौकशी केली जाणार आहे.
Scrutiny of suspicious birth and death certificates begins today.