जमिनीच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या

येवला तालुक्यातील ममदापूर तांड्यातील वाद, 11 संशयितांना अटक

येवला : प्रतिनिधी
तालुक्यातील ममदापूर तांडा येथे जमिनीच्या वादातून अर्जुन भीमराव चव्हाण (वय 22) या तरुणाची लोखंडी रॉड आणि काठ्यांनी बेदम मारहाण करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा थरार 27 जूनला रात्री 10 वाजेच्या सुमारास येवला उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर घडला. याप्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात 16 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितांतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या 4 ते 5 तासांत मुख्य संशयितासह 11 जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भीमराव चव्हाण आणि आरोपी हे सख्खे नातेवाईक असून, त्यांच्यात जमिनीचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. 27 जूनला सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास याच वादावरून दोन चुलत भावांमध्ये जोरदार भांडण झाले. त्यावेळी आरोपींनी अर्जुनला घरासमोर शिवीगाळ करत मारहाण केली होती.
या भांडणातील जखमींना उपचारासाठी येवला येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र, रात्री 10 वाजेच्या सुमारास आरोपींनी रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर दबा धरून बसले. फिर्यादीचा मुलगा अर्जुन चव्हाण हा समोर दिसताच आरोपींनी त्याच्यावर लोखंडी रॉड व काठ्यांनी पुन्हा अमानुष हल्ला केला.
या हल्ल्यात डोक्यावर व छातीवर गंभीर दुखापत झाल्याने, उपचार सुरू असतानाच अर्जुनचा मृत्यू झाला.
पोलिसांची जलद कारवाई; 11 जण गजाआड
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपअधिक्षक बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिसांनी तत्काळ तपास पथके तयार केली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांवरून मुख्य संशयित दादा जगन चव्हाण याच्यासह 11 संशयितांना ताब्यात घेतले. उर्वरित पाच आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत. अटक केलेल्या संशयितांना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आठ संशयिताना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, तर दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
या प्रकरणातील एक संशयित समाधान राठोड विधिसंघर्षित बालक असल्याने त्याला बाल न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.

Youth brutally murdered over land dispute

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *