3 जुलैला निवृत्तिनाथांच्या दिंडीचे आगमन; प्रशासनाची धावपळ
सिन्नर : प्रतिनिधी
पंढरपूरच्या वारीसाठी मार्गस्थ झालेल्या संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे 3 जुलै रोजी सिन्नर तालुक्यात आगमन होत आहे. हजारो वारकर्यांच्या स्वागतासाठी प्रशासन, ग्रामपंचायती आणि ग्रामस्थांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. मुक्काम स्थळांपासून पालखी मार्गापर्यंत सर्वत्र सुविधा उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. पालखी मार्गावरील रस्त्यांची डागडुजी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्यसेवा आणि स्वच्छता सुविधांवर विशेष भर देण्यात आला आहे.
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून निघालेली संत निवृत्तिनाथ महाराजांची पालखी 3 जुलै रोजी दुपारी पास्ते घाटातून सिन्नर तालुक्यात प्रवेश करणार आहे. येथे सुमारे पाच हजार वारकर्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानंतर लोणारवाडी येथे पालखीचा तालुक्यातील पहिला मुक्काम होणार आहे. वारकर्यांसाठी 90 बाय 70 फूट आकाराचा वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात येत आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने रात्रीच्या भोजनासह महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्नानगृहे, 250 मोबाइल शौचालये, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर आणि आरोग्य पथके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
4 जुलै रोजी पालखी लोणारवाडी येथून सिन्नरमार्गे कुंदेवाडीकडे प्रयाण करेल. दातली येथे दिंडीचा पहिला गोल रिंगण सोहळा आहे. तेथे विविध सुविधा देण्यात आल्या आहेत. खंबाळे येथे मुक्कामाची व्यवस्था केली आहे. 5 जुलै रोजी दिंडी सुरेगाव, मर्हळ, निर्हाळेमार्गे घोटेवाडीतील आश्विनाथ गडावरून अहिल्यानगर जिल्ह्यातील पारेगावकडे रवाना होणार आहे.
खासदार वाजे यांचा फिरता दवाखाना
वारकर्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पंचायत समितीच्या आरोग्य विभागाकडून सुविधा पुरविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे यंदाही खासदार राजाभाऊ वाजे यांचा त्र्यंंबकेश्वर ते पंढरपूर फिरता दवाखान्याचा उपक्रम सुरू राहणार आहे. डॉ. आर. डी. नाईकवाडी यांचे वैद्यकीय पथक या फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून वारकर्यांची शुश्रूषा करणार आहे.
34.5 किलोमीटर मार्गाची दुरुस्ती सुरू
सिन्नर तालुक्यातील 34.5 किलोमीटरच्या पालखी मार्गावरील खड्डे बुजवणे आणि रस्ता सुस्थितीत करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग व पंचायत समितीच्या बांधकाम विभागाकडून सुरू आहे. कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, उपअभियंता अविनाश देवरे, शाखा अभियंता हितेश मोरे, तसेच प्रभारी उपअभियंता अविनाश सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामे वेगाने सुरू आहेत. पुढील दोन दिवसांत ती पूर्ण होणार आहेत.
ग्रामपंचायतींना निधीची तरतूद
पालखी मुक्काम व रिंगण सोहळा स्थळांवरील सुविधांसाठी जिल्हा परिषदेकडून निर्मल वारी अंतर्गत संबंधित ग्रामपंचायतींना प्रत्येकी तीन लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पालखी नियोजनात कोणतीही कमतरता राहणार नाही, यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी दिली.
Elaborate preparations in Sinnar to welcome the Palkhi.