रुग्णालयांतील उपलब्ध खाटांची माहिती एका क्लिकवर
नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान लाखो भाविकांना दर्जेदार, तत्पर आणि अखंड आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासनासह वैद्यकीय महाविद्यालये, खासगी रुग्णालये, वैद्यकीय संघटना आणि सेवाभावी संस्थांनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश शिंपी, आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. कपिल आहेर, विविध वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता, आयएमएचे पदाधिकारी, रुग्णालयांचे प्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. डॉ. गेडाम यांनी सांगितले की, कुंभमेळ्यासाठी उभारण्यात येणार्या आरोग्य पायाभूत सुविधांची माहिती सर्व वैद्यकीय संस्था आणि संघटनांना देऊन त्यांच्याकडून सूचना व अभिप्राय घेण्यात यावेत. त्यामुळे आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि परिणामकारक होईल. तसेच आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत सेवा देणार्या रुग्णालयांचे मॅपिंग करून उपलब्ध खाटांची (बेड्स) अद्ययावत डिजिटल माहिती ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याने संभाव्य साथीच्या रोगांबाबत विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आरोग्य कर्मचार्यांना विशेष प्रशिक्षण देण्याबरोबरच सेवाभावी संस्था आणि स्वयंसेवी संघटनांनीही आरोग्य सेवेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन
त्यांनी केले. यावेळी आयुक्त शेखर सिंह यांनी पर्वणीच्या काळात स्थानिक नागरिकांच्या आरोग्य सेवांवर परिणाम होणार नाही, यासाठी स्वतंत्र नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शासनाने रुग्णालयांच्या सहभागासाठी तीन पर्याय निश्चित केल्याची माहिती देत, पर्वणीच्या काळात आपत्कालीन रुग्णांसाठी पुरेशा खाटा उपलब्ध ठेवण्याचे आवाहन केले.
आरोग्य नियोजनातील ठळक मुद्दे
शासन, खासगी रुग्णालये व सेवाभावी संस्थांचा समन्वय
आयुष्मान भारत व महात्मा फुले योजनेतील रुग्णालयांचे मॅपिंग.
साथीच्या रोगांवर नियंत्रणासाठी विशेष दक्षता.
आरोग्य कर्मचार्यांना आपत्कालीन परिस्थितीचे प्रशिक्षण.
पर्वणीच्या काळात भाविकांसह स्थानिक नागरिकांनाही अखंड आरोग्य सेवा.
Focus on establishing high-quality healthcare services during Simhastha.