– सविता एरंडे
आई, आज माझ्या मैत्रिणीचं केळवण आहे. आम्ही पाच, सहा मैत्रिणी तिला केळवणाचं सरप्राइज देणार आहोत. आई, आपल्याकडे ताटाच्या भोवती घालायच्या मोत्याच्या रांगोळ्या होत्या ना? त्या काढून द्या ना जरा… आमची लीना… सूनबाई म्हणत होती. कुठे ठेवल्या आहेत ते शोधावे लागेल, थोड्यावेळाने काढून ठेवते, असं म्हणून मी देवाच्या पूजेची तयारी करू लागले. देवाची सर्व उपकरणी काढताना मला देवाच्या कपाटात त्या रांगोळ्या सापडल्या. त्याच पिशवीत क्रोशाच्या सुईने विणलेल्या रांगोळ्यादेखील होत्या. लीना, हे बघ. मोत्यांच्या रांगोळ्या पण आहेत आणि या दुसर्या क्रोशाच्या रांगोळ्यादेखील आहेत. तुला कोणत्या हव्यात त्या बघ आणि घेऊन जा. लीनानं मोत्याच्या रांगोळ्या नेण्यासाठी बाजूला ठेवल्या… राहिलेल्या क्रोशाच्या रांगोळ्या पाहिल्यानंतर मात्र त्या रंगीत विणकामाप्रमाणे माझ्या मनात लेखनाचं विणकाम सुरू झालं. त्या रांगोळ्या पाहून मी आठवणींच्या उद्यानात कधी पोहोचले ते कळलेच नाही…..
माझं लग्न वयाच्या अठराव्या वर्षीच झालं. पूर्वीचा काळ… आई-वडील मुलींची लग्नं लवकर करून जबाबदारीतून मुक्त होत. कारण प्रत्येक कुटुंबात पाच सहा तरी बहिणी, भावंडं असतंच. आपल्या भावी जोडीदाराबद्दल मुलींच्या अपेक्षा विचारात घेतल्या जात नसतंच आणि मुलींनादेखील आपले आई-बाबा आपल्यासाठी चांगलंच स्थळ बघतील, असा विश्वास वाटायचा… खातं-पितं घर, थोडी शेतीवाडी,
स्वतःच्या पायावर उभा असणारा मुलगा असला की ते स्थळ चांगलं, असा सर्वसाधारण समज होता. त्यामुळं पदरी दोन-तीन मुली असल्या तरी आई-बाबांना त्यांच्या लग्नाची चिंता नसायची. घरच्या परिस्थितीप्रमाणे मुली शिकत असत. साधारणपणे मुलगी अकरावी पास झाली की वर संशोधन सुरू व्हायचं. योग्य वयात लग्न झालं की पुढील संसार… मुलंबाळं, शिक्षण, नोकरी इ. स्टेशनवरून गाडी अगदी छान, सुरळीतपणे चालू लागायची.
माझ्या लग्नानंतर आम्ही दोघं अहोंच्या नोकरीच्या गावी राहायला आलो. फरफर्या स्टोव्ह वगैरे फक्त अर्धं पोतं सामान घेऊन संसार सुरू झाला. एका सोसायटीत दोन खोल्यांत संसार हा सुखाचा म्हणत दिवस मजेत जात होते. वय लहान, त्यामुळं स्वयंपाक करताना तिखट, मीठ, मसाले माझी परीक्षाच घेत. नवीन जागा, नवीन माणसं, कुणाशी ओळख नाही. हळूहळू ओळखी वाढू लागल्या. मी दररोज सकाळी, संध्याकाळी पाय मोकळे करण्यासाठी फिरायला जायची. आमच्या सोसायटीपासून थोड्या अंतरावर एक छोटासा बैठा बंगला होता. त्या बंगल्याच्या बागेमध्ये दररोज माझ्या आजीच्या वयाच्या आजी आराम खुर्ची टाकून बसलेल्या असायच्या. कधी कधी बागेला पाणी घालायच्या. गोर्या गोर्या, बोलका गोल चेहरा, पाणीदार डोळे, मानेवर छोटासा अंबाडा व त्यावर फुलांचा गजरा… कधी कधी त्या क्रोशाच्या सुईनं विणकामदेखील करत बसलेल्या असायच्या. त्यांच्याकडे पाहिलं की मला माझ्या आजीचीच आठवण व्हायची….
एकदा संध्याकाळी मी फिरायला निघाले होते. का कुणास ठाऊक पण मला त्या आजींबरोबर थोडं तरी बोलावं असंच वाटायचं… शेवटी माझे पाय मला तिकडे घेऊन गेलेच… मला पाहिल्यावर त्या म्हणाल्या, ये बाळ, मी पाहते तुला रोज फिरायला जाताना… इथं नवीन आली आहेस ना? कुठून आलीस? हळूहळू सासर, माहेर, घरातली माणसं वगैरे माहिती सांगितल्यानंतर अगं, नवीन राहायला आल्यानंतर थोडे दिवस एकटं एकटं वाटतं, कुणाच्या ओळखी नसतात. त्यामुळं करमत नाही. पण काळजी करू नकोस. होतील हळूहळू ओळखी… तुला काही मदत लागली तर माझ्याकडे येत जा.. त्यांच्या लाघवी बोलण्यानं त्या आजींनी माझ्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं. काही काही व्यक्ती त्यांच्याशी एक-दोन वेळा बोललं तरी त्या आपल्याशा वाटू लागतात. त्यांच्याशी परत परत बोलावं, संवाद साधावा असं वाटतं. अनुभवांचे अनेक ऋतू सोहळे पाहणार्या या आजी खूप आनंदी व समाधानी होत्या.
एका संध्याकाळी त्या क्रोशाच्या सुईने विणत असताना मी थोडा वेळ त्यांच्याशी बोलावं म्हणून गेले. त्या विणत विणतच मला म्हणाल्या, ये. बैस. कशी आहेस? करमतंय का आता? हो, आता थोड्या थोड्या ओळखी झाल्या आहेत. त्यामुळं आता करमायला लागलंय.
आजी, हे विणकाम करताना तुमच्या डोळ्याला त्रास नाही का होत हो? किती नाजूक डिझाइन आहे हे! अगं, माझ्या हाताला इतकी सवय झाली आहे की न बघतादेखील माझं विणकाम चालू असतं. या विणकामात साखळी, खांब, खिडक्यांमधून डिझाइन, नक्षी तयार होत असते. साखळी, खांब, खिडक्या एकमेकांना अगदी घट्ट धरून ठेवतात.
आपली नाती पण अशीच असतात बरं का सविता? त्यांच्या तोंडून निघालेला सविता हा शब्द ऐकून जणू काही माझी आजीच माझ्याशी बोलते आहे असा मला भास झाला. पुढे त्या म्हणाल्या, आपली सर्व नाती अशीच एकमेकांना घट्ट धरून ठेवावी लागतात. अनेक नातेवाइकांशी आपले आपुलकीचे संबंध असतात. मला तर या क्रोशाच्या विणकामानं खूप खूप चांगल्या गोष्टी शिकवल्या…. संसारात कसं विरघळून जावं, स्वतःचं स्वपण विसरून, आपला ’ अहं बाजूला ठेवून सर्वांशी कसं जुळवून घ्यावं..या सगळ्या गोष्टी हे विणकाम करता करता शिकत गेले गं… म्हणजे आजी नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? अगं बघ ना, हा विणकामाचा दोरा जसजसा या विणकामात गुंतत जातो तसतसा तो ‘स्व’ला विसरून जातो.या दोर्याचं स्वतंत्र अस्तित्व रहात नाही. तो नवनवीन रूपं धारण करतो. तो रुमाल, तोरण, रांगोळ्या या नवीन रूपात स्वतःला सजवतो.आपल्या सर्व स्त्रियांचं आयुष्य असंच काहीसं आहे गं. आपण एकदा संसारात पडलो की, संसारात साखरेसारख्या विरघळून जातो. मामी, वहिनी, काकू इ. नवीन नाती निभावण्यात गर्क होतो. खरंय ना? हो आजी, मी आता हळूहळू याचा अनुभव घेते आहे.आजी पुढे म्हणाल्या, या विणकामात ज्या खिडक्या आहेत ना? त्या खिडक्या म्हणजे आपले सासर माहेरचे लोक, सगेसोयरे… आपण आपल्या मनाला हवी तेव्हा खिडकी उघडतो. बाहेरचा निसर्ग मनाला तजेला देतो. थंड, शीतल वार्याची झुळूक शांत मनाला शांतविते. तसेच आपले नातलग असतात गं… कधी एखाद्या सण समारंभाला एकत्र जमलो की चेष्टा मस्करीला उधाण येते. गप्पागोष्टी झाल्या की हा आनंद असाच दरवळत राहावा, असं वाटतं. हेवेदावे, उणीदुणी, रुसवे-फुगवे असतातच गं.. पण आपल्याला खूप थंड हवेचा त्रास झाला, उन्हाच्या झळा यायला लागल्या की खिडकी बंद करतो ना, तसंच या नातेवाइकांच्या न पटणार्या गोष्टी सोडून द्याव्यात… काही काळ या खिडक्या बंद ठेवाव्यात असं वाटतं. काही काळानंतर या सर्व गोष्टींचा विसर पडतो आणि पुन्हा भेटीगाठी होतच राहतात… पण खिडक्या किंवा खांब जसे घराला सोडून कुठेच जात नाहीत, तसंच हे नातलग आपलेच असतात.या विणकामातील खांब, खिडक्या या रुमालाची वीण घट्ट करत जातात आणि मग त्यातूनच सुबक असं नक्षीकाम साकारतं..
आता तू म्हणशील, ‘या
विणकामात साखळ्या पण असतात ना !… त्याचा आणि आपल्या सर्व नात्यांचा काय संबंध ?’ हो. अगदी माझ्या मनातलं बोललात आजी तुम्ही.. अगं, या साखळ्या म्हणजे आपली ओळखीची माणसं ! आपल्या मित्र-मैत्रिणी! म्हणजे बघ ना !…. आपलं जग जसं विस्तारत जातं तसतशा आपल्या ओळखी होतात…समाज, ऑफिस, शाळा, कॉलेज यामधल्या परिचयांच्या माणसांची एक साखळीच तयार होते. काही लोक आपल्यापासून दूर दूर जातात पण आपण जिथं जाऊ तिथं माणसं जोडतंच राहतो…पण आपण मधून मधून भेटतो, एकमेकांच्या संपर्कात राहतो. म्हणजेच ही एक प्रकारची मनाला समाधान देणारी अशी साखळीच असते बघ! या गोड माणसांच्या साखळी मुळं आपल्या आयुष्याचं सुबक नक्षीकाम साकारत असतं.
हो, आजी, खरंय तुमचं म्हणणं. आजकाल नातेवाइकांपेक्षा जोडलेली नाती संकटात पाठीराखे होतात हे मात्र खरंच हं! मलाही याचा वेळोवेळी अनुभव आहे.आजी पुढं म्हणाल्या, अगं, फक्त मित्रमैत्रिणीच नव्हे तर आपले शेजारी पण या क्रोशाच्या विणकामातील साखळ्यांप्रमाणे असतात. अडीअडचणीला नातेवाइकांपेक्षा तेच धावून येतात गं. शेजारधर्माची ही हिरवळ प्रत्येकाला लाभायलाच हवी. आजी, तुमचे हे अमृतबोल असे ऐकतच रहावे असं वाटतं. किती छान समजावून सांगता हो तुम्ही ! बरं का सविता, प्रत्येक स्त्रीचं साधारणपणे आयुष्य असंच असतं गं…
लग्नानंतर सर्वच मुलींना नव्या वातावरणात रुळायला वेळच लागतो… प्रत्येक घरात थोडेसे खाच खळगे, रुसवे-फुगवे असतातच…. परंतु सर्वांशी गोड बोलून, प्रत्येकाची मनं जिंकताना थोडी कसरत करावीच लागते…नमतं घ्यावंच लागतं. कोणतीही कला, छंद आपल्याला निवांतपणे विचार करण्यासाठी अवकाश देत असतात. या कला किंवा छंद आपल्याला पुढच्या मार्गासाठी दीपस्तंभसारख्या मदत करत असतात बघ… आता हे विणकाम करताना थोडंसं कुठंतरी चुकल्यासारखं वाटलं तर आपण परत ते उसवतो, दुरुस्त करतो ना अगदी तसंच आपल्या नात्यांचं असतं बघ… आपल्या भावनांची वीण कधी कधी उसवावीच लागते. म्हणूनच या कला आपल्याला परिस्थितीचं भान ठेवायला मदत करतात. मनाला थोडासा एकांत देतात. बर्याचशा गोष्टींचं मंथन करण्यासाठी अवकाश देतात..
आजींच्या जवळ पाच-दहा मिनिटं थांबलं तरी कितीतरी नव्या नव्या गोष्टी मला शिकायला मिळत असत. आमची त्या गावाहून बदली झाली. तेव्हा आजींनी माझ्या हातात क्रोशाच्या रांगोळ्या दिल्या आणि तू पण एखादा छंद लावून घे… एखादी नवीन कला शिकत जा…बघ तुला पण हा विरंगुळा
छान वाटेल.
आई! लीना मला हाक मारून सांगत होती, आई मी सगळा स्वयंपाक करून ठेवला आहे. मी या क्रोशाच्या रांगोळ्या घेऊन मैत्रिणीकडे जाते आहे. तिच्या बोलण्यानं माझी लेखणीरूपी क्रोशाची सुई थोडा वेळ विसावली. पण माझ्या मनात मात्र त्या सोज्वळ आजींच्या अनुभवामृताची वीण सुंदर विचारांचं नक्षीकाम साकारत होती.
The Weave of Relationships