पावसाळापूर्व कामांची ‘पोलखोल’

पावसाळा आता कुठे सुरू होत आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वीच्या कामांचा मोठा गाजावाजा केला जातो. महापालिका प्रशासन, महापौर-उपमहापौर व महापालिका अधिकार्‍यांचे पाहणी दौरे होतात. त्याचे फोटोसेशन होते. प्रसंगी श्रेयवाददेखील होतो, महापौर, उपमहापौर यांच्यात कलगीतुरा रंगतो. करोडो रुपये खर्च केल्याचे दावे केले जातात आणि केवळ एका पावसाने सगळ्यांचीच पोलखोल होते. हा दरवर्षीचा अनुभव नागरिक घेत असतात आणि प्रसंगी आपला जीव गमावत राहतात.
नालेसफाई, पाण्याचा निचरा, झाडांच्या फांद्या तोडणे यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. ते एका पावसात पाण्यात जातात. चेंबूर येथे शाळेतील मुलांना घेऊन जाणार्‍या स्कूल बसवर झाड कोसळून दुर्घटना घडली आणि यात जवळपास 14 शालेय विद्यार्थी जखमी झाले, तर एकाचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, हे झाड अतिशय जुने होते आणि याबाबत नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे तक्रारदेखील केली होती, तरीदेखील त्याकडे दुर्लक्ष केले गेले. लोकलचा खोळंबा होणे, रस्ते तुडुंब भरून वहाणे यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडणे, हे नित्याचेच झाले आहे. मॅनहोल उघडे राहणे आणि त्यात निष्पाप लोकांचे जीव जाणे काही थांबता थांबेना. 26 जुलै 2005 रोजी मुंबईत जवळपास नऊशे चौरेचाळीस मिलिमीटर पाऊस झाला होता.
ती ऐतिहासिक घटना आजही मुंबईकरांना आठवते. त्यात जवळपास अकराशे जणांचा मृत्यू झाला होता आणि मोठ्या प्रमाणावर जीवितहानीदेखील झाली होती. त्यावेळी मीदेखील दोन दिवस पावसात अडकलो होतो. कल्याण ते कसारा लोकल सेवा तर महिनाभर बंद होती. काही वर्षांपूर्वी मुंबईतील नामांकित डॉ. दीपक अमरापूरकर यांचा अशाच पद्धतीने दुर्दैवी मृत्यू झाला होता तो आपल्या यंत्रणांनी घेतलेला बळीच होता. याची न्यायालयानेदेखील गंभीर दखल घेतली होती. मात्र, आमच्या ढिम्म यंत्रणा, संवेदनहीन शासन-प्रशासन यांच्या कार्यपद्धतीत कोणताही बदल झाला नाही. यानंतरदेखील मॅनहोलमध्ये पडण्याच्या अनेक घटना घडल्या.
मुंबईमधील रस्त्यांवर आणि सांडपाण्याच्या व्यवस्थेत असलेल्या उघड्या मॅनहोलच्या सुरक्षेसाठी मुंबई उच्च न्यायालयाने रस्त्यांची स्थिती, मॅनहोलची सुरक्षा यावर बृहन्मुंबई महापालिकेला
निर्देश दिले आहेत. कठोर पावले उचलण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) आणि ठाणे महानगरपालिका (टीएमसी) प्रशासनाला दिले आहेत.
मॅनहोल सुरक्षेबाबत उच्च न्यायालयाचे प्रमुख निर्देश : शून्य जीवितहानीचे आश्वासन : दरवर्षी पावसाळ्यात मॅनहोलमध्ये पडून होणारे अपघात आणि मृत्यू थांबवावेत आणि यापुढे एकही जीव जाणार नाही, याची हमी द्यावी, अशी तंबी न्यायालयाने दिली आहे.
संरक्षक जाळ्या बसवणे
सर्व उघड्या मॅनहोल्सवर लोखंडी जाळ्या तातडीने बसवण्यात याव्यात. रस्त्यांची स्थिती, मॅनहोलची सुरक्षा यावर मुंबई उच्च न्यायालयाने बीएमसीला निर्देश दिले आहेत (प्रोटेक्टिव्ह ग्रील्स).
झाकण चोरीवर कठोर कारवाई
मॅनहोलची धातूची झाकणे चोरीला जाण्याच्या घटनांवर त्वरित एफआयआर दाखल करण्याचे
निर्देश.
साकीनाका येथे अस्लम शेख यांच्या मृत्यूप्रकरणी चार अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. संबंधित कंत्राटदारावर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच हलगर्जीपणा करणार्‍या महापालिका अधिकार्‍यांनाही निलंबित करण्यात आले आहे. मात्र, अशा कारवाया केवळ वेळ मारून नेण्यासाठी आणि सोपस्कार म्हणूनच होतात, हे वारंवार अधोरेखित होत आहे.
भ्रष्टाचाराबाबत बीएमसी नेहमीच चर्चेत असते. त्याची परिणती अशा दुर्घटनांमधे होते. बीएमसीचे वार्षिक बजेट हे देशातील अनेक लहान राज्यांपेक्षा अधिकच आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे, तरीदेखील दर पावसाळ्यात मुंबईकरांना वेठीस धरले जाते आणि नाहक निष्पापांचे बळी जातात. ही परिस्थिती बदलणार तरी कधी? मुंबईचे कारभारी, पहारेकरी, चौकीदार नेमके करतात तरी काय? चौकीदारी करणारे कारभारी बनले. मुंबईची मात्र अवस्था नेमिची येतो मग पावसाळा अशीच आहे. प्रत्येक कामात खाजगीकरणाचा तसेच कंत्राटीकरणाचा अट्टाहास धरला जातो आणि लाडका कंत्राटदार योजना राबवली जाते. त्याची परिणती मग अशा दुर्घटनांमध्ये होतेच, पण
महापालिकेचा पैसादेखील वाया जातो. जी परिस्थिती मुंबई, ठाणे परिसरातील आहे तशीच अवस्था राज्यभर आहे.

Pre-monsoon works exposed

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *