प्रशांत महासागरात अल निनो सक्रिय असल्याने देशात यंदा कमी पाऊस पडण्याचा अंदाज असताना जून महिना कोरडा गेला; परंतु जुलै महिन्यात पावसाने महाराष्ट्रासह देशभर हजेरी लावल्याने शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे. पावसाने जनजीवनावर परिणाम झाला, काही ठिकाणी नुकसानही झाले, तरी शेतीसाठी हा पाऊस उपयुक्त ठरला असून, पिण्याच्या पाण्याची समस्या काही प्रमाणात कमी करण्यासही तो उपयुक्त ठरला आहे. गेल्या चार दिवसांपासून नैर्ऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मान्सून संपूर्ण भारतात सक्रिय झाला आहे. महाराष्ट्रासह ओडिशा, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता आणि त्यानुसार पाऊसही पडला. पालघर व मुंबईत झालेल्या मुसळधारेनंतर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर भागात जवळपास 300 ते 350 मिलिमीटर इतक्या विक्रमी (ढगफुटीसदृश) पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. नाशिक जिल्ह्यात प्रत्यक्ष ढगफुटीसदृश पाऊस झाला नसला, तरी जोरदार पाऊस झाला आणि पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने गंगापूरसह अन्य धरणांतील साठ्यात वाढ झाली. पालघरमधील पावसाचा मुख्य भोवरा गुजरातच्या दिशेने सरकल्याने नाशिकवरील थेट ढगफुटीचा धोका टळला, तरी मुसळधार पाऊस मात्र सुरूच होता. दरम्यान, उत्तराखंडमध्ये ढगफुटीसदृश पावसामुळे अलकनंदा नदीला महापूर आला, तर ओडिशातही विक्रमी पावसाची नोंद झाली. मुंबई व महाराष्ट्रातही पावसाचा जोर कायम राहिला. देशभरातील एकूण 13 राज्यांत मुसळधार आणि वादळाचा तीव्र इशारा देण्यात आला होता. उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि केरळ या राज्यांत मुसळधारेने थैमान घातले. छत्तीसगडमध्ये सलग तीन दिवस पडलेल्या मुसळधारेमुळे नद्यांना पूर आला, तर 5 जुलैपासून बिहार व दिल्लीच्या अनेक भागांत मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला आहे. तिथेही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. महाराष्ट्रातही पावसाने चांगलेच थैमान घातले. मोसमी वार्यांनी कोकण, मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागांत धुडगूस घातल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. मावळ, मुळशी आणि कोकणपट्ट्यात दरडी कोसळल्याने रस्ते तसेच रेल्वेसेवा ठप्प झाली, तर मुसळधारेमुळे विमानसेवेवरही परिणाम झाला. महामार्गांवर दरडी कोसळण्याच्या छोट्या-मोठ्या घटनांमुळे मुंबई-पुणे रस्ता वाहतुकीवरही परिणाम झाला. जुन्या कसारा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली. राज्यात नद्यांना पूर आल्याने अनेक सखल भागांत पाणी शिरले आणि जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. यादरम्यान गुजरात ते केरळ किनारपट्टीदरम्यान गेले काही दिवस कमी हवेचा दाब कायम राहिला. याशिवाय बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर येऊन दक्षिण झारखंड तसेच ओडिशाच्या भागावर स्थिरावले. ते पुढे मध्य प्रदेशच्या दिशेने सरकणार आहे. राजस्थान ते ओडिशापर्यंतच्या पट्ट्यातही कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, सिक्कीम, बिहार, गोवा, कर्नाटक, आसाम आणि मेघालय या राज्यांतही मुसळधार पाऊस झाला. हवामानातील या घडामोडींमुळे राज्यात पुन्हा एकदा मान्सून जोमाने सक्रिय झाल्याचे दिसतेे. अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात ढग येत असल्याने कोकण तसेच मध्य महाराष्ट्राच्या भागात पावसाने अक्षरशः थैमान घातले आणि रविवार व सोमवारच्या पावसाने त्यात आणखी भर घातली. रविवारपासून या भागात पावसाची तीव्रता वाढली आहे. मुंबईसह रायगड, पालघर, लोणावळा, मावळ, मुळशी आणि पुणे या भागांत दरडी कोसळल्या असून, काही ठिकाणी जीवितहानीही झाली आहे. देहू, आळंदीतून वाहणार्या इंद्रायणी नदीने पूररेषा पार केली, तर खेड आणि चाकण भागातही अनेक घरांत पाणी शिरले. या पावसामुळे पुणे-नाशिक मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली. नाशिक शहर आणि परिसरात पावसाचा मारा दुसर्या दिवशी, सोमवारीदेखील कायम होता. पावसाने थोडीशीही उसंत घेतली नाही. सततच्या पावसामुळे प्रमुख रस्त्यांवर पाणी साचले आणि नागरिकांना साचलेल्या पाण्यातून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागला, तसेच शाळा-महाविद्यालयांनाही सुटी द्यावी लागली. जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने अनेक तलाव, सांडवे, ओढे-नाल्यांना पूर आला. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. एकंदर प्रतिकूल स्थितीतही देशात आणि राज्यात पाऊस झाल्याने शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना अल्पसा दिलासा मिळाला. अल निनो असूनही पाऊस चांगला पडला, हे एक सुदैवच म्हणावे लागेल. अल निनो असला म्हणजे पाऊस पडत नाही, हा गैरसमज आहे. बर्याचदा अल निनोमुळे मान्सून कमकुवत होतो हे खरे असले, तरी पाऊस ठरवणारा घटक तोच एकमेव नसतो. शिवाय हवामानाचे अंदाजही अनेकदा चुकतात. इंडियन ओशन डायपोल (आयओडी) या घटकाच्या सकारात्मक प्रभावानेही पाऊस पडतो. ज्याप्रमाणे प्रशांत महासागरात अल निनो कार्यरत असतो, त्याचप्रमाणे हिंदी महासागरात इंडियन ओशन डायपोल हा घटक कार्यरत असतो. यंदा हिंदी महासागराचा पश्चिमेकडील (आफ्रिकेकडील) भाग
पूर्वेकडील भागापेक्षा जास्त गरम झाला, ज्याला सकारात्मक आयओडी म्हणतात. आयओडी सकारात्मक असतो तेव्हा तो अल निनोचा प्रभाव पूर्णपणे नष्ट करतो किंवा कमकुवत करतो आणि भारताकडे येणार्या मान्सूनच्या वार्यांना प्रचंड गती व आर्द्रता देतो. यंदा नेमके हेच घडले असावे, म्हणूनच पाऊस पडला. गेल्या काही दिवसांत अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात लागोपाठ कमी दाबाचे पट्टे तयार झाले. त्यामुळे समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे थेट महाराष्ट्र आणि भारताच्या अंतर्गत भागाकडे खेचले गेले आणि मुंबई, कोकणासह अनेक भागांत अतिमुसळधार पाऊस झाला. जून महिन्यातील सुरुवातीच्या खंडानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस सुरू झाल्याने शेतकरीवर्गाला मोठा दिलासा मिळाला. धरणांमधील पाणीसाठ्यातही सकारात्मक बदल घडू लागले आहेत. गेल्या चार-पाच दिवसांत धरणक्षेत्रांत (कॅचमेंट एरिया) सातत्याने मुसळधार पाऊस पडत असल्याने, डोंगरावरून वाहून येणारे पाणी थेट धरणांमध्ये जमा होऊ लागले आहे. नाशिक, पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील प्रमुख धरणांचा जलसाठा आता वेगाने वाढू लागला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आगामी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांतही देशात पाऊस चांगला राहण्याची दाट शक्यता आहे. सध्याच्या काळात ’मॅडेन-जुलियन ऑसिलेशन’ (एमजेओ) हे ढगांचे आणि वार्यांचे चक्र पृथ्वीभोवती फिरत असून, ऑगस्ट महिन्यात ते पुन्हा भारताजवळ अनुकूल स्थितीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर हे महिने पावसाचेच राहतील, असा हवामान शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. मॅडेन-जुलियन ऑसिलेशन हे ढगांचे आणि वार्यांचे हवेतील एक जागतिक चक्र असून, त्याचा शोध 1971 मध्ये अमेरिकेतील हवामान शास्त्रज्ञ रोलँड मॅडेन आणि पॉल जुलियन यांनी लावला. हे चक्र म्हणजे पृथ्वीच्या विषुववृत्ताभोवती सतत पूर्वेकडे फिरणारा ढगांचा, पावसाचा आणि वार्यांचा एक प्रचंड मोठा पट्टा असून, त्याला पृथ्वीची एक फेरी पूर्ण करण्यासाठी साधारणपणे 30 ते 60 दिवसांचा कालावधी लागतो. या चक्राची मुख्य सुरुवात हिंदी महासागराच्या पश्चिम भागातून होते आणि तेथून प्रवास करत हे चक्र हळूहळू इंडोनेशियामार्गे प्रशांत महासागराच्या दिशेने पुढे सरकत राहते. जेव्हा या चक्राचा मुख्य सक्रिय भाग म्हणजेच ढगांचा आणि मुसळधार पावसाचा पट्टा भारताच्या भौगोलिक
क्षेत्राजवळ येतो, तेव्हा तो अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील मान्सूनच्या वार्यांना प्रचंड ताकद देतो. या सक्रिय टप्प्यामुळे भारतात अगदी दुष्काळी किंवा कोरड्या हवामानातही मान्सूनचा पाऊस अचानक तीव्र होतो आणि सर्वत्र मुसळधार पाऊस पडू लागतो. मात्र, जेव्हा हे चक्र पुढे सरकून प्रशांत महासागराकडे निघून जाते, तेव्हा भारताच्या क्षेत्रातील हवेचा दाब वाढतो, मान्सून सुस्तावतो.
A sense of relief!