विज्ञान आणि तंत्रज्ञान हे मानवाच्या कल्याणासाठी निर्माण झाले आहेत, मानव तंत्रज्ञानाचा गुलाम होण्यासाठी नाही. तंत्रज्ञानाचा वेगाने होणारा विस्तार मानवी जीवनाला सुकर करत असला, तरी त्याचे अतिअवलंबित्व आणि अंधानुकरण मानवी अस्तित्वासमोर नवीन आव्हाने उभे करत आहे. अलीकडच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाचा उदो उदो जगभरात चालू आहे. ‘मानवी मेंदूची जागा आता संगणकीय प्रणाली घेणार’ अशा थाटात अनेक जागतिक आस्थापनांनी मानवी मनुष्यबळाला डावलून ‘एआय’वर अब्जावधी रुपयांची गुंतवणूक केली; परंतु काही काळातच या तंत्रज्ञानाच्या मर्यादा, धोके आणि त्रुटी समोर येऊ लागल्या आहेत.
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात ‘एआय’च्या गैरवापरावर ओढलेले ताशेरे आणि अमेरिकेतील सुप्रसिद्ध ‘फोर्ड’ आस्थापनाने पुन्हा एकदा मानवी अभियंत्यांना कामावर घेण्याचा घेतलेला निर्णय या दोन्ही घटना ‘एआय’च्या मर्यादा आणि त्यातून निर्माण होणार्या भीषण संकटांची प्रकर्षाने जाणीव करून देणार्या आहेत. ‘एआय’ केवळ त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या डेटाच्या (माहितीच्या) आधारे काम करते. त्याला स्वतःचा विवेक किंवा नैतिकता नसते. जर चुकीचा डेटा किंवा खोटी माहिती ‘एआय’ला पुरवली तर ते हुबेहूब खरी वाटणारी पण पूर्णपणे अस्तित्वात नसलेली काल्पनिक कायदेशीर उदाहरणे आणि निकाल तयार करू शकतो. असे खोटे संदर्भ न्यायालयात सादर करणे म्हणजे न्यायव्यवस्थेची दिशाभूल करणे आणि पर्यायाने न्यायाचा गळा घोटण्यासारखे आहे, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. एस. नरसिमा आणि न्यायमूर्ती आलोक अराधे यांच्या खंडपीठाने ‘नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल’चा एक निर्णय रहित करताना अत्यंत मार्मिक टिप्पणी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की ‘एआय’द्वारे तयार केलेल्या बनावट किंवा काल्पनिक कायदेशीर उदाहरणांचा वापर करणे, हे भोपाळ गॅस दुर्घटनेतील विषारी वायुगळती इतकेच धोकादायक आहे.
‘फोर्ड’सारख्या जगविख्यात आस्थापनाने शेकडो अनुभवी मानवी अभियंत्यांना पुन्हा कामावर घेतले आहे. याचे कारण असे की, उत्पादनातील ज्या गुंतागुंतीच्या आणि गुणवत्तेशी संबंधित समस्यांचे निवारण मानवी मेंदू सहज करू शकत होता तिथे ‘एआय’ आधारित स्वयंचलित प्रणाली पूर्णपणे अपयशी ठरल्या आहेत. ‘कॉमनवेल्थ बँक ऑफ ऑस्ट्रेलिया’ आणि ‘आय.बी.एम’सारख्या दिग्गजनांनाही शेवटी कळून चुकले आहे की, ग्राहकांचे समाधान, भावना समजून घेणे आणि संकटसमई त्वरित योग्य निर्णय घेणे ही मानवी क्षमता ‘एआय’मध्ये कधीच येऊ शकत नाही. निश्चितच ‘एआय’चे काही लाभ आहेत. पुनरावृत्ती होणारी कामे जलद गतीने करणे, मोठ्या प्रमाणावरील डेटाचे वर्गीकरण करणे, वैद्यकीय संशोधनात सहाय्य करणे किंवा मानवी श्रमाची बचत करणे, यासाठी ‘एआय’ लाभदायी ठरते, परंतु जेव्हा या लाभांचे रूपांतर अंधानुकरणात होते, तेव्हा मोठी हानी चालू होते.
मानवी बुद्धीचा वापर कमी झाल्यामुळे समाजातील सर्जनशीलता आणि सखोल विचार करण्याची क्षमता नष्ट होत आहे. ‘एआय’च्या सहाय्याने हुबेहूब आवाज पालटणे, खोटे व्हिडिओ बनवणे आणि सायबर फसवणूक करणे अत्यंत सोपे झाले आहे. त्यामुळे सामाजिक शांतता आणि वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आली आहे. कर्मचार्यांना कामावर काढून ‘एआय’ आणल्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. ज्याचा फटका मध्यमवर्गीय कुटुंबांना बसत आहे. ‘एआय’मध्ये मानवी भावना, दया, करुणा आणि धर्मनिष्ठा नसते. केवळ लाभ आणि गणित यावर चालणारे हे तंत्रज्ञान मानवी मूल्यांचा र्हास करत आहे. आज जगासमोर सर्वांत मोठे आव्हान हे आहे की, ‘एआय’वर नियंत्रण ठेवणारी कोणतीही जागतिक आचारसंहिता किंवा कठोर कायदेशीर चौकट अजूनपर्यंत पूर्णपणे तयार झालेली नाही. तंत्रज्ञान ज्या वेगाने पुढे जात आहे, त्या वेगाने कायदे बनत नाही. याचा गैरफायदा घेऊन आतंकवादी संघटना, देशविरोधी शक्ती आणि गुन्हेगार एआयचा वापर करून देशाच्या अंतर्गत सुरक्षेला खिंडार पाडू शकतात. माहितीचे युद्ध आणि खोटा प्रसार करणे हे लोकशाही समोरील मोठे आव्हान बनले आहे. या भीषण समस्येवर मात करण्यासाठी समाज, आस्थापने आणि सरकार या तिन्ही स्तरावर व्यापक पावले उचलण्याची आवश्यकता आहे.
सामाजिक माध्यमांवर किंवा इंटरनेटवर येणारी कोणतीही माहिती, व्हिडिओ किंवा ऑडिओ खरा आहे की ‘एआय’ निर्मित आहे याची निश्चिती केल्याविना त्यावर विश्वास ठेवू नका आणि ती पुढे प्रसारित करू नका. केवळ ‘एआय’ किंवा ‘गुगल’वर विसंबून न राहता स्वतःचे वाचन, मनन आणि विवेक जागृत ठेवा.
The limitation of artificial intelligence