अश्विननगरात नागरिकांना चिंतेत
सिडको : विशेष प्रतिनिधी
अश्विननगर परिसरातील एएसएम सेक्टरमध्ये विविध विभागांच्या भूमिगत वीज आणि गॅस वाहिन्यांच्या नियोजनाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. येथील ड्रेनेज लाइनच्या वर गॅस पाइपलाइन आणि त्यावर महावितरणची उच्च दाबाची वीज लाइन टाकण्यात आल्याने भविष्यात दुरुस्तीची कामे करताना मोठ्या दुर्घटनेचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. सदरहू भागात ड्रेनेज लाइनमध्ये बिघाड झाल्यास खोदकाम करावे लागते. मात्र, त्याच मार्गावर गॅस पाइपलाइन आणि त्यावर उच्च दाबाची वीजवाहिनी टाकण्याचे काम करण्यात येत असल्याने कोणतेही दुरुस्तीचे काम अत्यंत जोखमीचे ठरणार आहे. अशा परिस्थितीत गॅसगळती, वीजपुरवठा खंडित होणे किंवा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, विविध विभागांकडून विकासकामे करताना परस्पर समन्वयाचा अभाव असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. एका विभागाने टाकलेल्या सुविधेवर दुसर्या विभागाने दुसरी लाइन टाकल्यामुळे भविष्यात देखभाल व दुरुस्तीची मोठी अडचण निर्माण होणार असल्याचे नागरिकांनी सांगितले. येथील स्थानिक नागरिकांनी महापालिका, महावितरण आणि संबंधित गॅस कंपनीच्या अधिकार्यांनी संयुक्त पाहणी करून या ठिकाणची स्थिती तपासावी, अशी मागणी केली आहे. आवश्यक असल्यास तांत्रिक निकषांनुसार संबंधित लाइनचे पुनर्नियोजन करून संभाव्य धोका टाळावा, अशी मागणीही येथील नागरिकांनी केली आहे.
Gas line over the drainage, and a high-tension power line above that.