मनमाडच्या एकलव्यनगर परिसरात घाणीचे साम्राज्य

पालिकेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष; आदिवासी बांधवांत नाराजी

मनमाड : प्रतिनिधी
मनमाड येथील बुरकलवाडी परिसरातील एकलव्यनगरात सध्या कचर्‍याचे आणि घाणीचे प्रचंड साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात कचर्‍याचे ढीग साचल्याने स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक वेळा तक्रार
करूनही पालिकेचा आरोग्य विभाग याकडे साफ दुर्लक्ष करत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या भागात पालिकेची घंटागाडी नियमितपणे येत नाही. परिणामी, साचलेल्या कचर्‍यामुळे आणि पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. या घाणीमुळे डासांचे प्रमाण वाढले असून, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांची भीती निर्माण झाली आहे. आम्ही नियमित कर भरूनही पालिकेकडून मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
प्रशासनाने या समस्येची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त रहिवाशांनी दिला आहे. पालिकेच्या मुख्य अधिकार्‍यांनी व आरोग्य विभागाने एकलव्यनगर परिसरातील कचरा तातडीने उचलून या भागात नियमित घंटागाडी सुरू करावी, अशी आग्रही मागणी केली जात आहे.

आदिवासीबहुल भाग असल्याने दुर्लक्ष का?

आम्ही आदिवासी बांधव या देशाचे नागरिक असून, नियमित कर भरतो. एकीकडे देशात स्वच्छ भारत अभियानाच्या घोषणा दिल्या जातात, तर दुसरीकडे आम्हाला मूलभूत स्वच्छतेसाठी संघर्ष करावा लागत आहे. हा भाग आदिवासीबहुल असल्यानेच पालिका प्रशासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे का? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Filth runs rampant in the Eklavyanagar area of ​​Manmad.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *