एसआयआर अर्ज वितरणातील दिरंगाईवर आ. देवयानी फरांदे आक्रमक

अधिकार्‍यांची कानउघाडणी; मतदारांपर्यंत अर्ज पोहोचवा

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेंंतर्गत अनेक भागांमध्ये अद्याप अर्ज नागरिकांपर्यंत पोहोचले नसल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर आमदार देवयानी फरांदे यांनी सोमवारी (दि. 13) अधिकार्‍यांवर नाराजी व्यक्त करत प्रशासनाची चांगलीच कानउघाडणी केली. मतदार नोंदणी प्रक्रियेत कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. प्रत्येक पात्र मतदारापर्यंत अर्ज वेळेत पोहोचले पाहिजेत, अशा स्पष्ट सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
मतदार नोंदणी अधिकारी अर्पिता ठुबे यांनी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या एसआयआर मोहिमेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी आमदार देवयानी फरांदे यांच्यासह नाशिक मध्य मतदारसंघातील सर्व नगरसेवक, तहसीलदार अमोल निकम, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित होते. बैठकीत मतदान केंद्रनिहाय एसआयआर प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. अनेक भागांमध्ये अर्जांचे वितरण पूर्ण न झाल्याचे निदर्शनास येताच आमदार फरांदे यांनी संबंधित अधिकार्यांना धारेवर धरले.
अर्ज वितरणातील विलंबामुळे नागरिकांना त्रास होणार नाही, याची तातडीने दक्षता घ्यावी तसेच प्रत्येक घरापर्यंत अर्ज पोहोचविण्यासाठी आवश्यक उपाययोजना तत्काळ राबवाव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या मतदान केंद्रस्तरीय अधिकार्‍यांचा आमदार फरांदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
दुसरीकडे अपेक्षित प्रगती न झालेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकार्‍यांशी चर्चा करत त्यांच्या अडचणीही त्यांनी जाणून घेतल्या. तांत्रिक अडचणी आणि मनुष्यबळाशी संबंधित अडथळ्यांची माहिती त्यांनी जाणून घेतली. यावेळी त्यांनी नगरसेवकांना आपापल्या प्रभागात बीएलए मार्फत मदत करण्याचे निर्देशही दिले. तसेच बीएलओ यांच्याशी समन्वय ठेवून मतदारांपर्यंत पोहोचावे, असेही त्यांनी सांगितले.

विशेष सखोल पुनरीक्षण ही लोकशाही बळकट करणारी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. मतदारसंघातील एकही पात्र मतदार या प्रक्रियेपासून वंचित राहू नये, हीच आमची भूमिका आहे. प्रत्येक घरापर्यंत अर्ज पोहोचणे, मतदारांना आवश्यक मार्गदर्शन मिळणे आणि संपूर्ण प्रक्रिया विहित कालावधीत पारदर्शकपणे पूर्ण होणे, यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तसेच बीएलओ यांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. यादृष्टीने निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी बोलावलेल्या बैठकीत सूचना देण्यात आल्या.
– प्रा. देवयानी फरांदे, आमदार

MLA Devyani Farande takes a tough stance on the delay in distributing SIR applications.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *