संशयितांना तत्काळ अटक करा
घोटी : प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील वाकी-बिटोरली येथील दिव्यांग नागरिक काशीनाथ आगिवले यांच्या स्विफ्ट कारची (एमएच 15- बीएन 6994) अज्ञातांनी तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली. 15 जुलैला रात्री 11 च्या सुमारास ही घटना घडली आहे. 24 तास उलटूनही संशयित फरार असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कार घराशेजारील मळ्यात उभी असताना अज्ञातांनी हल्ला करून तिचे मोठे नुकसान केले. याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, वाढत्या गुन्हेगारीमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. या घटनेवर प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष सोपान परदेशी यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. दिव्यांग व्यक्तीला लक्ष्य करून त्याच्या मालमत्तेचे नुकसान करणे अत्यंत गंभीर आहे. पोलिसांनी तपासाला गती देऊन आरोपींना तात्काळ जेरबंद करावे. तसेच दिव्यांग हक्क कायद्याच्या (दिव्यांग अॅक्ट) कलम 92 अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. संशयितांना त्वरित अटक न झाल्यास प्रहार दिव्यांग संघटना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही सोपान परदेशी यांनी प्रशासनाला दिला आहे.
Vandalism of a car belonging to a person with a disability