परदेशी वनस्पतींचे उच्चाटन करा : गायकवाड
नाशिक : प्रतिनिधी
यंदा पावसाने ओढ दिल्याने शेतीसमोर संकट निर्माण झाले असले तरी हीच परिस्थिती स्थानिक जैवविविधतेच्या संवर्धनासाठी सुवर्णसंधी ठरू शकते. नवीन वृक्षारोपण करण्याऐवजी आधीच लावलेल्या रोपांचे संगोपन, त्यांना पाणी देणे आणि घाणेरी, रानमारी, कॉसमॉस, रानतुळस, सुबाभूळ, अकेशिया, ग्लिरिसिडिया यांसारख्या आक्रमक परदेशी वनस्पतींचे नियंत्रण करावे, असेे आवाहन आपलं पर्यावरण संस्थेचे शेखर गायकवाड यांनी केले आहे.
यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे शेतीवर त्याचे विपरीत परिणाम होत असले, तरी स्थानिक परिसंस्थेचे पुनर्स्थापन करण्यासाठी ही महत्त्वाची संधी असल्याचे मत नाशिकच्या आपलं पर्यावरण संस्थेचे गायकवाड यांनी व्यक्त केले.
गेल्या चार-पाच वर्षांपासून सातत्याने चांगला पाऊस पडत असल्याने घाणेरी, रानमारी, कॉसमॉस, रानतुळस, टिकोमा यांसारख्या आक्रमक झुडपांसह सुबाभूळ, अकेशिया आणि ग्लिरिसिडिया या परदेशी वृक्षप्रजाती मोठ्या प्रमाणावर वाढल्या. या वनस्पतींनी डोंगरदर्या, जंगले, शेतजमिनी आणि मोकळ्या जागांवर वेगाने प्रसार करून स्थानिक वनस्पतींची जागा, पाणी, सूर्यप्रकाश आणि जमिनीतील पोषकद्रव्यांवर ताबा मिळवला. त्यामुळे स्थानिक जैवविविधतेवर मोठा
परिणाम झाला.
यावर्षी मात्र सुरुवातीच्या मर्यादित पावसामुळे या वनस्पतींची वाढ प्राथमिक अवस्थेत आहे. जमिनीतील ओलाव्यामुळे त्यांची रोपे आणि जुनी झुडपे समूळ काढणे तुलनेने सोपे असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. त्यामुळे आक्रमक परदेशी वनस्पतींच्या नियंत्रणासाठी हीच योग्य वेळ असल्याचे त्यांनी सांगितले.
नाशिक देवराई आणि नाशिक वनराई येथे गेल्या काही वर्षांपासून घाणेरी, रानमारी, कॉसमॉस, रानतुळस, ग्लिरिसिडिया, सुबाभूळ आणि अकेशिया यांसारख्या आक्रमक वनस्पतींचे नियमित नियंत्रण करून स्थानिक प्रजातींची लागवड व संवर्धन करण्यात आले. त्यामुळे तेथील जैवविविधतेत लक्षणीय वाढ झाल्याचा अनुभवही त्यांनी मांडला.
दरवर्षी विविध संस्था आणि समूहांकडून वृक्षारोपणासाठी संपर्क केला जातो. मात्र, यंदा नवीन रोपे लावण्याऐवजी नागरिकांनी घरातून पाच लिटरची पाण्याची कॅन आणून आधीच लावलेल्या रोपांना पाणी घालण्याच्या मोहिमेत सहभागी व्हावे. श्रमदानातून आक्रमक परदेशी वनस्पतींचे उच्चाटन करून स्थानिक जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन गायकवाड यांनी केले आहे.
यंदा कमी पावसामुळे नवीन वृक्षारोपण करण्यापेक्षा आधीच लावलेल्या रोपांचे संगोपन करणे अधिक महत्त्वाचे आहे. घाणेरी, रानमारी, कॉसमॉस, रानतुळस, सुबाभूळ, ग्लिरिसिडिया, अकेशिया यांसारख्या आक्रमक परदेशी वनस्पतींचे श्रमदानातून उच्चाटन केल्यास स्थानिक जैवविविधतेचे संवर्धन अधिक प्रभावीपणे होईल. नवीन रोपे लावण्यापेक्षा लावलेली रोपे जगविणे आणि आक्रमक वनस्पतींवर नियंत्रण मिळवणे, हेच यंदाचे खरे निसर्ग संवर्धन ठरेल.
– शेखर गायकवाड, आपलं पर्यावरण संस्था, नाशिकFocus on ensuring the survival of saplings rather than just planting trees during the rainy season.