विशाखा बल्लाळ
अरे व्वा, मावशी किती गोड दिसत आहेस…
दिसणारच… रंगरंगोटी केलीये ना मावशीने आज…
तसं काही नाही हं काका, माझी मावशी आहेच सुंदर…
हो, मी कुठे नाही म्हणतोय… ती तशी रोजच छान दिसते…
मग…
हो अगं, पण ज्या दिवशी मेंटेनन्स झाला ना त्या दिवशी स्कूटर किंवा तुझी ऍक्टिव्हा कशी सॉफ्ट चालते ना.. आणि अगदी नव्यासारखी दिसते ना…
काय काका? स्कूटीची आणि मावशीची तुलना करताय तुम्ही…
अगं, तसं नाही, पण आपण म्हणतो ना, शरीर हे यंत्र आहे.. मग आपण यंत्राची कशी निगा राखतो, काळजी घेतो, रेग्युलर सर्व्हिसिंग करतो, एखादा पार्ट खराब झाला तर दुसरा टाकतो आणि आपल्या यंत्राचे आयुष्य कसे वाढेल, आपण त्याच्याकडून कसे जास्तीत जास्त काम करून घेऊ शकू.. तेही त्याच्या कॅपॅसिटीमध्ये वाढ होऊन… हे पाहतो ना… तसंच आपण शरीराच्या बाबतीतही केलं पाहिजे…
हो, काका, हे मात्र तुम्ही अगदी खरं बोलले…
मग, मी नेहमी खरेच बोलतो बरं….
सतत काम करून शरीरही थकते, त्यालाही विश्रांती हवीच असते ना… आणि विश्रांतीबरोबरच नियमित व्यायाम, योगा अशी जोड असली की शरीर टकाटक राहते….
………
काय चालल्यात गप्पा माझ्या भाचीबरोबर…
काही नाही गं मावशी… असंच काका सांगताहेत…. मेंटेन करायला हवं सगळं….
हो अगं, हे सर्वांना तेच सांगतात आणि स्वतः देखील फॉलो करतात..मी पण माझ्या सहकारी मैत्रिणींना हेच सांगत असते आणि त्यांच्याकडून करवून ही घेत असते. बसल्या बसल्या हाताची बोटे हलवणे, पंजा मागे-पुढे करणे, तसंच पायांच्या बाबतीत… मान देखील हळूहळू मागे नेणे, पुढे करणे, डोळ्यांना मिटून किंवा गोल गोल फिरवून आराम किंवा व्यायाम…. देणे, एखादा राऊंड मारून येणे.. हे सहज शक्य असलेले व्यायाम करायला हवेत ग…अगं, माझं जाऊ दे… तुझं सांग. आज कशी उगवलीस मध्येच… वीकेंड नाही की सुट्टी नाही…..
अगं, आज जरा बोअर वाटतं होतं म्हणून आले मी तुझ्या घरी फ्रेश व्हायला… तुझ्या घरी आलं की किती छान वाटतं, पॉसिटिव्ह शपशीसू मिळते. तुमच्या घरचं वातावरण किती प्रसन्न असतं नेहमीच..
खरंय गं अगदी…ह्याला कारणीभूत हवेत घरचे सगळेच सदस्य.. कोणा एकाच्या प्रयत्नाने हे साध्य होत नाही. आमच्या घरचे वळणच असं आहे की घरात शांतता पाहिजे, खेळीमेळीच्या वातावरणात शरीर आणि मन दोन्ही स्वस्थ राहते…
आणि मावशी तुझ्या घराप्रमाणेच तुझ्या घरातल्या वस्तूदेखील पॉसिटिव्ह आहेत गं…
चल, काहीतरी काय… वस्तू काय बोलतात का?
नाही मावशी, खरं आहे माझं बोलणं… तुझे हे इनडोअर प्लांट्स, हे गोल काचेच्या बाउलमध्ये मुक्तपणे विहरत असलेले गोल्ड फिश, गॅलरीतून हळूच बैठकीत डोकावत असलेले अस्परगस आणि हे काय ह्याला रंगीबेरंगी फुलं कसे? मी कधी ऐकलं नाही ग अस्परगसला फुलं आलेली….?
ही तुझ्या कलात्मक नजर असलेल्या मावशीची कमाल..
म्हणजे? मी नाही समजले..
अगं, क्रॉषाची फुले आहेत ती…
अगंबाई, कृत्रिम वाटतंच नाहीयेत ती..
मग, आहे ना तिची कमाल आणि ते बघ, किती अप्रतिम पेंटिंग आहे ते विठ्ठलाचे…
हो, तिच्या पेंटिंंगचे तर आम्ही सगळे फॅन आहोत.
आणि इकडच्या वॉलवर धबधाब्याचे चित्र, नैऋत्य दिशेला पाणी हवं ना…
हो कां… काका, म्हणजे वास्तुशास्त्र ही आणले का यामध्ये मावशीने..?
नाही बाई.. वास्तुशास्त्र वगैरे काही नाही हं, मनाला भावेल, पटेल, रुचेल, आवडेल ते करत असते मी आपली…
हो, पण किती छान गं… म्हणून तर तू माझी फेव्हरेट मावशी आहेस..
हं, गळ्यातले हात काढा आधी आणि चला अप्पे खायला. खाद्ययोग छान आहे तुझा आज…
व्वा….दिल खुश कर दिया आपने तो हमारा…
जीवनात ही घडी…. म्हणू का मावशी?
चल, चहाटळ कुठली…