प्रवीण पुरो
शाहरुख खान याचा मुलगा आर्यनवरील ड्रग्ज माफियागिरीचे आरोप एनसीबीला मागे घ्यावे लागले आणि या कारवाईच्या निमित्त आपला सोज्वळ चेहरा पुढे आणणारे एनसीबीचे तत्कालीन डायरेक्टर समीर वानखेडे यांचं खरं विक्राळ रूप जगापुढे आलं. सामान्य वाटतं तसा हा अधिकारी नाही, याची खात्रीही जगाला पटली. अर्थात अपवाद भाजपचे नेते आणि त्यांचे भाडोत्री भक्त.. आर्यनच्या एका प्रकरणाने वानखेडे आणि त्यांच्या गँगचे धंदे बाहेर आले. आर्यनवरील कारवाईच्या निमित्ताने या गँगने याआधी केलेल्या कारवायांची चर्चा सुरू होणं स्वाभाविक आहे. ज्यांच्यावर अन्याय झाला ते आता वानखेडेंची मोजणी करणार यात संदेह नाही. मग तो वानखेडेंच्या फ्लॅटसमोर राहणार्या पोलीस अधिकार्याचा मुलगा असेल वा पहिल्या पत्नीचा भाऊ असेल. कर्माची फळं वानखेडेंना चाखावीच लागतील. असली कृत्य करताना आपण माणसात जगतो, याचं भानही या मंडळींना नव्हतं. कॉर्डेलिया क्रूझवरील रेव्ह पार्टीदरम्यान टाकलेल्या छाप्यात आर्यनला समीर वानखेडे यांनी अटक करून त्याच्याविरोधात पुरावे एकत्र करण्याचा घाट घातला होता. त्याला अडवण्यासाठी वानखेडे गँगने बरेच प्रयत्न करून पाहिले. पण, सारा मामला संशयास्पद असल्याने अखेर आर्यनला यातून क्लीन चिट मिळाली. आता क्लीन चिट मिळाली म्हणून केवळ आर्यन सुटणार नाही किंवा वानखेडे यांची बदली होऊन भागणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली तरच भरडणार्यांना न्याय मिळेल. वानखेडे गँगविरोधी झालेल्या काळ्या आरोपांची चौकशीही होण्याची आवश्यकता आहे. कारण यात सार्या गोष्टी लपल्या आहेत. ही गँग कारवाई करताना आपली पोतडी भरते, असा गंभीर आरोप तेव्हा अनेकांनी केला होता. यात राज्यातील मंत्री नवाब मलिक यांनी तर विविध पुराव्यांचा आधार घेतला होता. या पुराव्यांचा पाठपुरावा एनसीबीने करावा, अशी अपेक्षा होती. पण वानखेडे यांच्यामागे अनेक बदमाशांच्या अशीर्वादाचे हात असल्याने या चौकशा होतील, यावर कोणाचा विश्वास राहिलेला नाही. अधिकार्याने ठरवलं तर एखाद्या निष्पापाला ते कसं देशोधडीला लावू शकतात, याचं उत्तम उदाहरण म्हणजे आर्यनची अटक म्हणता येईल. गुजरातचे तत्कालीन पोलीस अधीक्षक असलेले संजीव भट यांना तर मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावून न्यायालयांनीही आपण धुतल्या तांदळाचे प्यादे नाहीत, हे दाखवून दिलं आहे. आर्यन हा बड्या बापाचा मुलगा असल्याने तो पुरून उरला. पण असे असंख्य निष्पाप विविध चौकशी संस्थांच्या खाबूगिरीचे बळी ठरले आहेत. ‘वानखेडे एक झांकी है..’ हे यासाठीच म्हटलं जातं. या माणसांनी असल्या कारवायांच्या आधारे आपली नामी आणि बेनामी घरं भरून घेतली. एनसीबी असो वा ईडी, सीबीआय असो वा आयकर. यातील अधिकार्यांचं राहणीमान पाहिलं की त्यांचे उपद्वाप लक्षात यायला वेळ लागत नाही. चौकशी संस्थांचा आपल्या क्षेत्रातला अखेरचा टप्पा गणल्या जाणार्या पोलीस ठाण्यांमध्ये याहून वेगळं काही होत असेल, असं नाही. देशात सुधारलेल्या महाराष्ट्रात त्याहून काही वेगळं आहे, असं मानायला कोणाचं मन तयार नाही. यामुळेच तो पोलीस ठाण्याची पायरी चढायचं नाव घेत नाही. कोणाला तरी वाचवण्यासाठी एखाद्या निष्पापाला अडकवलं की आपलं इप्सित साध्य होत असतं. बड्या धेंडांची नावं घ्यायची आणि पैशांच्या बदल्यात त्यांना सुटं सोडून तिसर्यालाच शुळावर देण्याचे प्रकार खुलेआम होतात. ज्यांच्याबाबत हे घडतं ते काहीही करू शकत नाहीत. सामान्य चेहर्याच्या व्यक्ती प्रामाणिकपणाचा आव आणतात तेव्हा अधिक सजग राहण्याची आवश्यकता असते, हे वानखेडेंच्या चेहर्याने महाराष्ट्राला शिकवलं. आर्यनला अडकवण्याचं हे गणित वानखेडे गँगने पद्धतशीर उभं केलं आणि आर्यनकरवी आपली कमाई करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप तेव्हा झाला. सुरुवातीला या आरोपावर कोणाचा विश्वास बसत नाही. कारण वानखेडे यांचा अबोल चेहरा. त्यात स्वत:ला शुचिभूर्ततेची मूर्त समजणार्या देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या होयब्या पदाधिकार्यांनी यात घेतलेली उडी. वानखेडेंच्या एकेक भानगडी बाहेर येत असताना भाजपची ही माणसं त्यांच्या बचावासाठी नको तो आव आणत होती. ही गँग आपले खिसे भरून घेत असल्याचं बाहेर येऊ लागलं आणि भाजप नेत्यांची बोलती बंद झाली. आश्चर्य म्हणजे वानखेडेंसारख्यांच्या बचावार्थ या मंडळींनी राजभवनाचाही आधार घेतला. सोज्वळ दिसलं म्हणजे प्रामाणिकता जपली असं नाही. आपल्या अशा चेहर्याचा पद्धतशीर वापर करत एनसीबीत मागून नको ते धंदे केले जात होते.
आर्यन खान याच्यावर कारवाई करताना समीर वानखेडे यांनी दाखवलेली घाई हेच दाखवून देत होती. तरीही भाजपची मंडळी याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत होती. त्यांनी वानखेडे यांच्या सोज्वळ वाटणार्या छब्या नाचवल्या. देवेंद्र फडणवीस यांचाच अशीर्वाद आहे म्हटल्यावर भाजपची गँग वानखेडेंसाठी रस्त्यावर उतरली. त्यात नवाब मलिक पडले मुस्लिम. वानखेडे हे मराठी असल्याचा आव आणत या मंडळींनी महाराष्ट्र डोक्यावर घेतला. पुढे वानखेडेंची जातकुळीच बाहेर आल्यावर ही मंडळी स्वत:ला रोखतील, असं वाटत होतं. या मंडळींचं प्रेम वानखेडेंवर नव्हतं, राग मलिकांवर होता. तो व्यक्त करण्यासाठी फडणवीसादी माणसं उत्तान झाली. किरीटसारखे आगलावे वानखेडेंच्या घरी पोहोचले. आणि सत्तेपुढे आव्हान निर्माण करणार्या राज्यपाल कोश्यारींनी या खोटारड्यांना बळ दिलं.
आता वानखेडेंचा खरा चेहरा बाहेर आला आहे. अधिकार गाजवताना उघड बदमाशी केली जात होती. कोण्या किरण गोसावी आणि मनीष भानुशाली या भाजप समर्थकांची साथ घेत आपल्या कार्यालयाचा वापर बदमाशांच्या हाती दिला. हाच किरण गोसावी अंगरक्षकाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये वाशीत ताब्यात घेतो. रवींद्र कदम नावाचा तो अंगरक्षक पुढे बेपत्ता होतो, या सार्या विचार करण्याबाहेरच्या घटना होत्या. या सार्यांना पोसणार्या वानखेडेंनी आर्यनला 28 दिवस कोठडीत डांबलं. खोटे पुरावे गोळा करण्याचे प्रयत्न झाले. पण ते फिरतील याची जाणीव झाल्यावर आखडतं घ्यावं लागलं. अखेर आर्यन आरोपातून बाहेर आला. एका निष्पाप तरुणाच्या जीवनाच्या वाताहतीचं ज्याने कृत्य केलं त्या समीर वानखेडे यांना याची शिक्षा न झाली तर अशा बदमाश अधिकार्यांचा धीर चेपेल. काहीही केलं तरी आपलं काही वाकडं होऊ शकत नाही, याची खात्रीच त्यांना होईल. आज एक वानखेडे आहेत अशा निष्पापांना देशोधडीला लावणार्या अनेक बदमाशांना हा धडा आहे. मग ते एनसीबीत असो वा ईडीत, सीबीआयमध्ये असोत की आयकरमध्ये.. त्यांच्या कृत्याची काळी बाजू तपासण्यासाठी त्यांच्या नावे आणि बेनामी मालमत्तेची चौकशी झाली तरी पुरेशी आहे. निरपराधांना तुरुंगात डांबणार्या वानखेडे यांच्यावर घटनेतील तरतुदीनुसार किमान चार वर्षांची कोठडी होऊ शकते. देशातील विरोधी पक्षांच्या मागे हात धुवून लागलेल्या अंमलबजावणी संचालनालयाला हे सूचलं कसं नाही? अधिकाराचा गैरवापर करून बक्कल कमाई करणार्यांच्या मुसक्या का आवळल्या जात नाहीत? ईडीने ताब्यात घेतलेल्या अनेक मालमत्ता या तिथे कार्यरत असलेल्या अधिकार्यांचे चाराऊ कुरण बनलं आहे. मालमत्ता गोठवायच्या आणि त्या परस्पर फुंकायचे नवे धंदे तिथे सुरू झालेत. भाड्यातील मालमत्ता या जणू तिथल्या अधिकार्यांच्याच मालकीतील असाव्यात इतका व्यवहार बेमालून सुरू असताना सारं काही अलबेल असल्यागत त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. एनसीबीसह इतर चौकशी संस्थांवरील सामान्यांचा विश्वास पुढे टिकवून ठेवायचा असेल तर वानखेडे यांच्याविरोधी कारवाई ही व्हायलाच हवी. म्हातारी मेल्याच्या दु:खाहून काळ सोकावणं फारच गंभीर होय.
समीर वानखेडेंच्या एकूणच हालचालींची चौकशी करण्याची वाढती मागणी होऊ लागल्यावर नार्कोटिक ब्यूरोने या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष चौकशी गट निर्माण करून हे प्रकरण त्या गटाकडे सोपवलं होतं. या गटाच्या अहवालात वानखेडे यांनी केलेल्या कारवाईचा पुरता पंचनामा करण्यात आला आहे. चौकशी अधिकारी असलेले वानखेडे हे आर्यन खान याला अडकवण्याच्या मागे लागल्याचं चौकशी गटातील अधिकार्यांनी म्हटलं आहे. आर्यनचे मित्र असलेल्या अरबाज मर्चंट आणि मुनमून धमेचा यांना ताब्यात घेऊन आर्यनचा या प्रकरणाशी संबंध असल्याचं त्यांच्याकडून वदवून घेण्याचा प्रयत्न सुरू होता. अरबाज याच्याकडून सहा ग्रॅम इतका अंमली पदार्थाचा साठा मिळाल्याचं एनसीबीने आपल्या आरोपपत्रात म्हटलं होतं. या दोघांनीही आर्यनचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचं वानखेडेंना सांगूनही त्यांनी शहानिशा केली नाही. नको ते पुरावे पुढे करत वानखेडे गँगने आर्यन हा पहिल्या क्रमांकाचा आरोपी बनवण्यासाठी सारी शक्ती पणाला लावली. विशेष म्हणजे किल्ला कोर्टानेही न्यायादरम्यान मौन धारण करत आर्यनची रवानगी एनसीबी तुरूंगात केली. आर्यनचा फोन ताब्यात घेऊन त्यातील व्हॉट्सऍप उघडून संवाद संकलित करत विविध शब्दांचा अनर्थ काढला. त्या निमित्ताने त्याला सुमारे 28 दिवस तुरुंगात डांबून ठेवलं. खरं तर व्हॅट्सऍपवरील संवाद उघड करण्याचे कोणतेही अधिकार वानखेडे वा त्याहून वरिष्ठांना नाहीत. असं असूनही त्यांनी हे संवाद बिनदिक्कत माध्यमांना पुरवले. माध्यमांना पुरवलेल्या माहितीचा गैरफायदा घेत वानखेडे गँगने आर्यन याचा जामीन सातत्याने रद्द करून घेतला आणि त्याची रवानगी आर्थररोड तुरुंगात करायला लावली.