घराघरांत सर्वेक्षण, डासांच्या उत्पत्तिस्थळांवर कारवाई
नाशिक : प्रतिनिधी
शहरात डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया आणि स्वाइन फ्लूच्या संभाव्य वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने व्यापक प्रतिबंधात्मक मोहीम हाती घेतली आहे. शहरात डेंग्यूचे 56 रुग्ण आहेत. दरम्यान, साथीच्या आजारांचा प्रसार रोखण्यासाठी प्रथम बाधित रुग्ण आढळलेल्या परिसरात विशेष सर्वेक्षण व तपासणी केली जाणार असून, त्यानंतर टप्प्याटप्प्याने शहरातील इतर भागांमध्येही ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेंतर्गत प्रत्येक आरोग्यवर्धिनी केंद्राच्या कार्यक्षेत्रात मलेरिया फील्ड वर्कर आणि आरोग्यसेविकांचे संयुक्त पथक घराघरांत जाऊन सर्वेक्षण करणार आहे. प्रत्येक घरातील पाण्याची भांडी, कूलर, फ्रीजच्या मागील भागात साचलेले पाणी, गच्ची, सज्जा, झाडांच्या कुंड्या तसेच डासांची उत्पत्ती होऊ शकणार्या इतर ठिकाणांची तपासणी करण्यात येईल. डास अळी आढळल्यास तातडीने पाणी रिकामे करणे, अबेटिंग करणे तसेच आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जाणार आहेत.
यासोबतच ताप, अंगदुखी किंवा इतर लक्षणे असलेल्या संशयित व्यक्तींची माहिती संकलित करून त्यांची तातडीने नजीकच्या रुग्णालयात तपासणी करण्यात येईल. यापूर्वी डेंग्यू, चिकनगुनिया किंवा मलेरियाचे रुग्ण आढळलेल्या घरांच्या परिसरात विशेष लक्ष केंद्रित केले जाणार असून, खासगी रुग्णालयांकडून संशयित अथवा बाधित रुग्णांची माहिती मिळाल्यानंतर संबंधित परिसरात 48 तासांच्या आत आरोग्य पथकांकडून प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. महापालिकेने नागरिकांना घर व परिसरात पाणी साचू न देणे, आठवड्यातून एकदा पाण्याची भांडी रिकामी करणे, कूलर व इतर पाण्याची साठवण असलेल्या ठिकाणांची नियमित स्वच्छता करणे आणि तापाची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन केले आहे. साथीच्या आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांचा सक्रिय सहभागही तितकाच महत्त्वाचा असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
याकडे लक्ष द्या
आठवड्यातून किमान एकदा घरातील पाण्याच्या टाक्या, हौद, बादल्या व इतर भांडी स्वच्छ करून कोरडी करा. कूलर, फ्रीजच्या ट्रे,
फुलदाण्या, कुंड्यांखालील ताटल्या आणि छतावरील पाण्याचे साचलेले भाग नियमित रिकामे करा. जुने टायर, प्लास्टिकचे डबे, नारळाच्या करवंट्या, बाटल्या किंवा पाणी साचू शकणार्या वस्तूंची तात्काळ विल्हेवाट लावा. सर्व पाण्याच्या टाक्या व साठवणुकीची भांडी झाकून ठेवा, अशा सूचना केल्या आहेत.
56 Dengue cases; Municipal Corporation launches special drive.