पंचवटीच्या सभेत प्रशासन धारेवर
पंचवटी : प्रतिनिधी
पंचवटी प्रभागात सर्वत्र ठिकठिकाणी पडलेले खड्डे, त्यामुळे होणारे अपघात, अपुरा व दूषित पाणीपुरवठा आणि अतिक्रमण यांसारख्या गंभीर नागरी समस्यांवरून बुधवारी (दि. 5) पार पडलेली पंचवटी प्रभाग समितीची सभा अत्यंत वादळी ठरली. लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेत महापालिका प्रशासनाच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले. सभापती रोहिणी पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली.
सभेच्या सुरुवातीलाच नगरसेविका प्रियंका माने यांनी अमृतधाम चौकात खड्ड्यांमुळे दोन नागरिक जखमी झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. जोपर्यंत बांधकाम विभागाचे मुख्य अधिकारी सभेत येत नाहीत, तोपर्यंत सभा तहकूब करण्याची मागणी त्यांनी केली. नगरसेविका इंदूबाई खेताडे यांनी थेट स्वतःची सूनच खड्ड्यात पडून जखमी झाल्याची व्यथा मांडली. खड्डे बुजवण्यासाठी असलेला एकमेव ट्रॅक्टर नादुरुस्त असल्याने काम ठप्प असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रशासनाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत सभेत नगरसेवकांनी प्रशासनाला घेरले.
गौरव गोवर्धने यांचा ‘लाव रे तो ऑडिओ’
प्रभाग तीनमधील लोकांना पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनमध्ये ड्रेनेज पाणी मिसळत असल्याची तक्रार एक महिलेने नगरसेवक गौरव गोवर्धने यांना फोनद्वारे केली होती. ती ऑडिओ क्लिप भरसभेत नगरसेवक गोवर्धने यांनी ऐकवली. त्यामुळे ‘लाव रे तो ऑडिओ’ हा संदेश
सभेत गाजला.
गॅस पाइपलाइन फुटल्याने नगरसेवकांची धाव
कंसारा माता चौकात एमएनजीएलची गॅस पाइपलाइन फुटल्याची माहिती मिळताच प्रभाग 1 चे नगरसेवक रंजना भानसी, प्रवीण जाधव, दीपाली गिते व रूपाली नन्नावरे यांनी बैठक अर्धवट सोडून थेट घटनास्थळी धाव घेतली.
टास्क फोर्सची निष्फळता
महापालिकेने स्थापन केलेला ’टास्क फोर्स’ फक्त दाखवण्यासाठीच आहे का? असा रोखठोक सवाल प्रवीण जाधव यांनी केला. मागील सभेतील सूचनांवर काय कारवाई झाली, असा जाबही त्यांनी विचारला. अपूर्ण आणि निकृष्ट काम, गॅस पाइपलाइन व सीसीटीव्ही केबलसाठी वेगवेगळ्या एजन्सींनी रस्ते खोदले असून, काम पूर्ण झाल्यावर योग्य कम्पॅक्शन न केल्याने रस्ते खचण्याची भीती गुरुमित बागा यांनी व्यक्त केली.
Potholes dominated the proceedings of the Municipal Corporation’s ward committee meeting.