नाशिक : प्रतिनधी
शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून सातपूरमध्ये प्रशासनाविरोधात लोकप्रतिनिधी आक्रमक झाले आहेत. नाशिक शहरात तब्बल 15 हजार खड्डे बुजवल्याचा दावा करणार्या अधिकार्यांनी नागरिकांची दिशाभूल केली असून, प्रत्यक्षात शंभरही खड्डे बुजवले गेले नाहीत, असा गंभीर आरोप सातपूरच्या नगरसेवकांनी केला आहे. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन आणि महापौर हिमगौरी आडके यांनी दिलेल्या सूचनांनुसार दर्जेदार साहित्य वापरून तातडीने खड्डे बुजवावेत, अन्यथा सर्व नगरसेवक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा बैठकीत देण्यात आला.
प्रभाग सभापती समाधान देवरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सातपूर विभागीय कार्यालयात तातडीची बैठक झाली. शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, नागरिकांच्या संतापाला स्थानिक लोकप्रतिनिधींनाच सामोरे जावे लागत असल्याची खंत नगरसेवकांनी व्यक्त केली. बैठकीला नगरसेवक दिनकर पाटील, विश्वास नागरे, नितीन निगळ, माधुरी बोलकर, अंकिता शिंदे, उषा बेंडकुळे, सोनाली भंदुरे, मानसी शेवरे, नयना जाधव, कविता लोखंडे, संगीता घोटेकर, हर्षदा गायकर, सविता काळे यांच्यासह कार्यकारी अभियंता नवनीत भामरे, विभागीय अधिकारी सुनील राजभोज, उपअभियंता बी. एम. ठाकरे व कनिष्ठ अभियंते उपस्थित होते.
मनपा अभियंत्याला दिनकर पाटलांनी खडसावले
सातपूर प्रभाग समितीच्या झालेल्या बैठकीत प्रभाग क्रमांक 9 चे नगरसेवक दिनकर पाटील खड्ड्यांच्या प्रश्नावर चांगलेच भडकल्याचे दिसून आले. त्यांनी प्रभाग समितीच्या बैठकीत मनपा अभियंता संजय अग्रवाल यांना खड्ड्यांच्या प्रश्नावर खडे बोल सुनावले. खड्डे कशातून बुजविणार? कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? शहरात पंधरा हजार खड्डे कोणते बुजविले, असा सवाल त्यांनी केला. सातपूरच्या प्रभागाला कॉन्ट्रॅक्टर कोण दिला आहे ते सांगा. आमच्या वर्षभरातल्या निधीतून खड्डे बुजविणार का? असे प्रश्न विचारत त्यांनी खड्ड्यांच्या प्रश्नावर आपला संताप व्यक्त केला.
रात्रभर खड्डे बुजवले, सकाळी पुन्हा ‘जैसे थे!’
सभापतींसह आम्ही चारही नगरसेवक रात्री बारा वाजेपर्यंत रस्त्यांवरील खड्डे बुजवत होतो. मात्र, दुसर्या दिवशी सकाळी परिस्थिती पुन्हा पूर्ववत होती. त्यामुळे भाऊ आणि ताई यांनी सांगितलेल्या दर्जेदार साहित्यानेच काम झाले पाहिजे; अन्यथा आम्ही चौघेही नगरसेवक रस्त्यावर बसून आंदोलन करू.
– भागवत आरोटे, नगरसेवक, प्रभाग 26
Satpur corporators issue ultimatum to administration