पंचवटीतील धोकादायक वाडे जमीनदोस्त

पंचवटी : प्रतिनिधी
भिवंडी शहरात धोकादायक इमारत कोसळून झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेची आणि जीवितहानीची पुनरावृत्ती नाशिक शहरात होऊ नये, यासाठी महापालिकेने कठोर भूमिका घेत पंचवटी विभागात धोकादायक वाडे पाडण्याची धडक कारवाई करण्यात आली.
कारवाईपूर्वी नगर नियोजन विभागामार्फत संबंधित वाडामालकांना कायदेशीर नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. वाड्यांमधील वास्तव्य तातडीने बंद करावे, इमारती रिकाम्या कराव्यात आणि धोकादायक भाग स्वतःहून उतरवून घ्यावा, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाने दिल्या होत्या. मात्र, मुदत उलटूनही आवश्यक ती कार्यवाही न झाल्याने महापालिकेने थेट बुलडोझर चालवत हे वाडे पाडण्यास सुरुवात केली. या मोहिमेदरम्यान पंचवटी परिसरातील काळाराम मंदिराच्या दक्षिण दरवाजा आणि सरदार चौक भागातील सुमारे सात धोकादायक वाडे पाडण्यात आले. तसेच, या भागात प्रस्तावित असलेल्या रामकाल पथ विकास प्रकल्पाच्या मार्गातील अडथळे आणि अतिक्रमणेही तातडीने हटवण्यात आली. ही कारवाई उपआयुक्त सुवर्णा दखने, पंचवटी विभागीय अधिकारी राहुल जाधव आणि अधीक्षक चौधरी यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत कनिष्ठ लिपिक मिलिंद जाधव, गाडीप्रमुख प्रवीण बागूल, नंदू खंडारे, राजू साळुंखे, दत्ता आहेर, विजय गरुड यांच्यासह पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला होता.

Dangerous mansions in Panchavati demolished

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *