स्पर्धा परीक्षांतील अनियमिततेवरून झारखंड राज्यातील विद्यार्थी गेल्या दहा दिवसांपासून आंदोलन करत असून, त्यांचे आंदोलन सोमवारी (10 ऑगस्ट 2026) पेटले. केंद्र सरकारच्या अखत्यारितील नीट परीक्षेतील पेपरफुटी व अनियमिततेविरोधात कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीत जंतर-मंतरवर बेमुदत निषेध आंदोलन सुरू केले होते. आंदोलनापुढे झुकून धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला. प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी ही कॉक्रोच जनता पार्टीची प्रमुख मागणी होती. कॉक्रोच जनता पार्टीप्रमाणेच झारखंडमधील विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात कोणीही प्रमुख नेता नाही. विद्यार्थ्यांनी कोणाच्याही राजीनाम्याची मागणी केलेली नाही. झालेल्या परीक्षा रद्द कराव्यात, या मागणीवर विद्यार्थी ठाम असून, याशिवाय सीबीआय चौकशीची मागणीही आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके आणि त्यांचे सहकारी सौरव दास व आशुतोष रांका यांनी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला असला, तरी त्यांच्यापैकी कोणीही झारखंडची राजधानी रांची येथे जायला पाहिजे होते. संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांचे प्रश्न हाती घेणारे दीपके आणि त्यांच्या सहकार्यांनी झारखंडमध्येही जाऊन विद्यार्थ्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची चर्चा करण्याची तयारी असली, तरी परीक्षा रद्द करण्याच्या मागणीवर विद्यार्थी ठाम आहेत. झारखंडची राजधानी रांची येथील मोराबादी मैदान, जयपालसिंग मुंडा स्टेडियम आणि विधानसभा परिसरात विद्यार्थ्यांचे तीव्र आंदोलन सुरू आहे. झारखंड लोकसेवा आयोग, झारखंड कर्मचारी निवड आयोग आणि कंबाइंड ग्रॅज्युएट लेव्हल (सीजीएल) अशा काही स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी व कथित घोटाळ्यांची सीबीआय चौकशी व्हावी, यासाठी आंदोलन सुरू आहे. दि. 28 जानेवारी 2024 रोजी कर्मचारी निवड आयोगाच्या सीजीएल परीक्षेतील सामान्यज्ञानाचा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द झाली. ती पुन्हा 21-22 सप्टेंबर 2024 रोजी घेण्यात आली; मात्र व्हॉट्सअॅपद्वारे उत्तरपत्रिका फुटल्याचे सीआयडी तपासात उघड झाले. तसेच, जुलै 2022 मधील कर्मचारी निवड आयोगाच्या जेई परीक्षेतही अनियमितता दिसून आली. ऑगस्ट 2026 मधील चौदाव्या राज्य लोकसेवा परीक्षेच्या निकालात ओएमआर शीटमध्ये फेरफार झाल्याच्या आरोपामुळे सरकारने ही परीक्षा रद्द करण्याचे मान्य केले आहे. या घोटाळ्यांमध्ये पेपर लीक करणार्या टोळीने उमेदवारांकडून प्रत्येकी 12 ते 15 लाख रुपये घेऊन, परीक्षा सुरू होण्यापूर्वीच उमेदवारांकडून उत्तरे पाठ करून घेतली होती. एकापाठोपाठ एक परीक्षांमध्ये घोटाळे झाल्याने विद्यार्थी संतप्त झाले. सोमवारी, 10 ऑगस्ट 2026 रोजी विद्यार्थ्यांनी विधानभवनाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. मागण्यांसाठी विधानभवनाच्या दिशेने निघालेल्या विद्यार्थ्यांच्या मोर्चावर मोठे अडथळे निर्माण करण्यात आले. मात्र, विद्यार्थ्यांना रोखण्यात अपयश येत असल्याचे लक्षात आल्यानंतर लाठीहल्ला करण्यात आला. विद्यार्थी आंदोलकांना थांबवण्यासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी काटेरी तारांचे अडथळे उभे केले. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक हालचालीवर पाळत ठेवण्यासाठी ड्रोनचाही वापर करण्यात आला. असे असूनही, विद्यार्थ्यांनी तीन अडथळे ओलांडून जगन्नाथ मंदिराजवळ पोहोचले. मात्र, या ठिकाणी विद्यार्थ्यांना थांबवण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी रस्त्यावर बसून आंदोलन सुरू केले. शेवटच्या अडथळ्यापाशी पोहोचल्यावर पोलिसांनी विद्यार्थ्यांवर पाण्याचे फवारे मारले; पण पांगण्याऐवजी आंदोलन करणारे विद्यार्थी नाचू लागले. जंतर-मंतरवरून संसदेकडे विद्यार्थ्यांनी कूच केली तेव्हा दिल्ली पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, तसाच प्रयत्न झारखंड पोलिसांनी रांचीमध्ये केला. देशाची राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीने आंदोलन केले, त्याच पद्धतीने झारखंडमधील विद्यार्थी आंदोलन करत आहेत. हजारो विद्यार्थ्यांनी व बेरोजगारांनी हातात तिरंगा आणि मागण्यांचे फलक घेत झारखंड विधानसभेच्या दिशेने मोर्चा काढला. आंदोलकांनी बॅरिकेड्स हटवत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनात गेल्या नऊ दिवसांपासून उपोषणाला बसलेले झारखंड लोकतांत्रिक क्रांतिकारी मोर्चाचे नेते देवेंद्रनाथ महतो प्रकृती खालावलेली असतानाही रुग्णवाहिकेतून मोर्चात सहभागी झाले. उपोषणामुळे त्यांचे वजन 10.5 किलोने घटल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी त्यांच्या हातात माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे छायाचित्र होते. महतो यांचा पक्ष कोणत्याही राजकीय आघाडीत नाही. दिल्लीत शिक्षण व पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी बेमुदत उपोषण केले होते. रांचीमध्ये महतो यांनी वांगचुक यांचे अनुकरण केले आहे. दरम्यान, राज्य सरकारने आंदोलकांसोबत चर्चेच्या अनेक फेर्या घेतल्या आहेत. चर्चेच्या ताज्या फेरीनंतर आंदोलकांच्या 98 टक्के मागण्या मान्य केल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला. मात्र, आंदोलकांनी हा दावा फेटाळत आपल्या प्रमुख मागण्यांवर सरकारकडून ठोस निर्णय झालेला नसल्याचे म्हटले आहे. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, 13 भरती परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, सरकारने त्यापैकी केवळ तीन परीक्षा रद्द करण्यास सहमती दर्शवली आहे. त्यामुळे आंदोलक आणि सरकारमधील तणाव कायम आहे. विद्यार्थी नेते रवींद्र पासवान यांनी सरकारवर दबाव कायम ठेवला आहे. “सीबीआय चौकशीची आमची मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही,” अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारसमोर जे आव्हान उभे राहिले होते, तेच आव्हान झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाच्या महागठबंधनासमोर (इंडिया आघाडीसामोर) उभे राहिले आहे. जंतर-मंतरवरील आंदोलनाला आम आदमी पार्टी, समाजवादी पक्ष, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे) या इंडिया आघाडीतील पक्षांनी पाठिंबा दिल्याचा आरोप भाजपने केला होता. झारखंडच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी भाजपसमर्थित अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मैदानात उतरली आहे. या संघटनेच्या
कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलनात पश्चिम बंगालमधून भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते आणण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. राजकारण बाजूला ठेवून विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे कोणत्याही सरकारने अत्यंत संवेदनशीलतेने पाहिले पाहिजे.
Jantar-Mantar in Ranchi