तिढा सुटला; रायगडला भरत गोगावले
मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील महायुती सरकारमध्ये गेल्या दीड ते दोन वर्षांपासून प्रलंबित असलेला नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे. राज्य शासनाने नुकतेच याबाबत अधिकृत परिपत्रक जारी केले असून, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि जलसंपदा तसेच कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे नाशिक जिल्ह्याची, तर शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले यांच्याकडे रायगड जिल्ह्याची धुरा सोपवण्यात आली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतर झालेल्या या घोषणेमुळे, या दोन्ही जिल्ह्यांना प्रदीर्घ काळानंतर पूर्णवेळ पालकमंत्री मिळाला असून, प्रशासकीय कामकाजाला आता अधिक गती मिळण्याची शक्यता आहे.
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर जेव्हा पालकमंत्र्यांची पहिली यादी जाहीर झाली होती, तेव्हा रायगडचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांना, तर नाशिकचे पालकमंत्रिपद गिरीश महाजन यांना देण्यात आले होते. मात्र, घटक पक्षांमधील अंतर्गत मतभेद आणि राजकीय रस्सीखेच यामुळे अवघ्या 24 तासांतच या नियुक्त्यांना स्थगिती देण्यात आली होती. रायगडमध्ये शिवसेनेकडून भरत गोगावले तीव्र आग्रही होते, तर नाशिकमध्ये शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांच्या नावाची चर्चा होती. या तिढ्यामुळे गेली दीड वर्षे ही दोन्ही पदे रिक्त होती आणि हा विषय महायुतीसाठी डोकेदुखी ठरत होता.
कुंभमेळ्याच्या पुस्तिकेत आधीच महाजनांचा उल्लेख
यंदाच्या स्वातंत्र्यदिनी (15 ऑगस्ट) रायगड जिल्ह्यात ध्वजारोहणाचा मान मंत्री भरत गोगावले यांना देण्यात आला होता, तेव्हाच त्यांच्या गळ्यात पालकमंत्रिपदाची माळ पडण्याचे स्पष्ट संकेत मिळाले होते. या अधिकृत नियुक्तीमुळे रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी त्यांनी पाहिलेले स्वप्न अखेर साकार झाले आहे. दुसरीकडे, नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका पुस्तिकेवर गिरीश महाजन यांचा ’पालकमंत्री’ असा उल्लेख आधीच केला होता. त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्रिपदी महाजनच परतणार, या चर्चेवर आता अधिकृत मोहोर उमटवली गेली आहे.
पालकमंत्री म्हणून नव्हे,
सेवक म्हणून काम करणार
कुंभनगरी नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली आहे. ही जबाबदारी सोपवल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाजन यांनी मनःपूर्वक आभार. नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा आणि गती देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.नाशिकच्या विकासासाठी पालक म्हणून नव्हे, तर सेवक म्हणून काम करण्याचा निर्धार महाजन यांनी व्यक्त केला आहे. नियुक्तीची बातमी समजताच गिरीश महाजन यांनी ’पांडुरंग पावला’ अशी सूचक प्रतिक्रिया देत नाशिकचा चेहरामोहरा बदलण्याचा शब्द दिला आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य व्यवस्था, पर्यटन, रोजगारनिर्मिती आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांच्या बळकटीकरणाला प्राधान्य दिले जाणार आहे.आगामी कुंभमेळा हा नाशिकच्या विकासासाठी मोठी संधी असून, या माध्यमातून नाशिकची ओळख देशासह जागतिक स्तरावर अधिक ठळक करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. विकासाला नवी दिशा आणि नवी गती देण्यासोबतच नाशिककरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तसेच कुंभनगरीचा नावलौकिक देश-विदेशात अधिक उंचावण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू, असे गिरीश महाजन यांनी नमूद केले.
Girish Mahajan finally appointed as Guardian Minister of Nashik.