डॉ. भारती पवार उपाध्यक्ष; मालवीय यांची गच्छंती
नवी दिल्ल : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी सोमवारी पक्षाची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. आगामी राज्य विधानसभा निवडणुका आणि संघटनात्मक संतुलन साधण्याच्या दृष्टीने या नव्या कार्यकारिणीत मोठे फेरबदल करण्यात आले असून, यात अनुभवी नेत्यांसोबतच युवा नेतृत्वालाही स्थान देण्यात आले आहे. या नव्या टीममध्ये महाराष्ट्रातील नेत्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. विनोद तावडे आणि डॉ. भारती पवार यांच्याकडे महत्त्वाच्या जबाबदार्या देण्यात आल्या आहेत. याशिवाय, एकूण तीन माजी मुख्यमंत्री आणि दहा माजी मंत्र्यांना या नव्या कार्यकारिणीत स्थान मिळाले आहे.
या नव्या कार्यकारिणीत विनोद तावडे यांच्यावर पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदाची (महामंत्री) जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. तसेच, माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे पक्षाच्या ’राष्ट्रीय कोषाध्यक्ष’पदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून, प्रीती गांधी यांना सोशल मीडिया सह-संयोजक बनवण्यात आले आहे. या नियुक्त्या तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्या आहेत.
महिलांना भक्कम प्रतिनिधित्व
पक्षाच्या आयटी सेलमध्येही मोठा बदल करण्यात आला असून, अमित मालवीय यांची गच्छंती करून त्यांच्या जागी छत्तीसगडचे दीपक म्हस्के यांची निवड केली आहे. या नव्या कार्यकारिणीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 13 राष्ट्रीय उपाध्यक्षांपैकी 6 पदांवर महिला नेत्यांची निवड केली आहे, ज्यामुळे महिलांना भक्कम प्रतिनिधित्व मिळाले आहे. पक्षाच्या प्रसारमाध्यम विभागाची धुरा मात्र खासदार अनिल बलूनी यांच्याकडेच कायम ठेवण्यात आली आहे.
स्मृती इराणी, वसुंधरा राजे यांचे कमबॅक
या फेरबदलातील महत्त्वपूर्ण बाब म्हणजे माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे झालेले पुनरागमन. 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्मृती इराणी यांना पुन्हा एकदा राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्त करून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. दुसरीकडे, वसुंधरा राजे यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे.
BJP’s National Executive announced.