लखीसराय :
बिहारमधील लखीसराय जिल्ह्यातील ’अशोक धाम’ येथे चेंगराचेंगरीची घटना घडली. प्राप्त माहितीनुसार, या घटनेत सात भाविकांचा मृत्यू झाला आहे; मात्र प्रशासनाने अद्याप कोणतीही अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, श्रावण महिन्यातील तिसर्या सोमवारी ’जलाभिषेक’ करण्यासाठी सुमारे 50,000 भाविक तिथे जमले होते, त्यावेळी ही चेंगराचेंगरी झाली.
चेंगराचेंगरीनंतर भाविक घाबरून धावू लागले आणि अनेकजण एकमेकाखाली चिरडले गेले. घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. अपघातात जखमी झालेल्या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अचानक गर्दी वाढल्याने घटना घडली.लखीसरायचे जिल्हाधिकारी शैलेंद्र कुमार यांनी सांगितले, ही घटना सकाळी साडेसहा वाजता घडली. मंदिरात अचानक गर्दी वाढली. स्थानकावर दोन गाड्या आल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक मंदिर परिसरात पोहोचले.
सकाळी भाविक रांगेत उभे असतानाच बॅरिकेड्स कोसळले. लोक एकमेकांवर पडल्याने चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली.
Stampede at a temple in Bihar’s Lakhisarai; seven devotees dead.