वृक्षलागवड, जलसंधारण अन् जैवविविधता संवर्धनाची दखल
सिन्नर : प्रतिनिधी
गावाच्या विकासाची दिशा केवळ रस्ते आणि इमारतींपुरती मर्यादित न ठेवता पर्यावरण संवर्धनाला केंद्रस्थानी ठेवणार्या भोकणी ग्रामपंचायतीच्या कामाची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे.
‘झाडाचे गाव’ म्हणून ओळख निर्माण केलेल्या सिन्नर तालुक्यातील भोकणी ग्रामपंचायतीला छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने नाशिक येथील आयुक्त कार्यालयात जलसंपदा
मंत्री तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. सरपंच अरुण वाघ आणि ग्रामसेवक योगेश राहाणे यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने पुरस्कार स्वीकारला. सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि एक लाख रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनासोबतच जलसंधारण, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत ग्रामविकासासाठी राबविलेल्या उपक्रमांची दखल घेत भोकणीची निवड करण्यात आली.
वन विभागातर्फे देण्यात येणार्या या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी राज्यभरातून 121 प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी 81 प्रस्तावांचे मूल्यांकन करण्यात आले. त्यानंतर वनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समितीने भोकणी ग्रामपंचायतीची पुरस्कारासाठी निवड केली.
सरपंच अरुण वाघ यांच्या संकल्पनेतून आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमांमुळे भोकणीने ‘झाडाचे गाव’ अशी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. राज्यस्तरीय वनश्री पुरस्कारामुळे या सामूहिक प्रयत्नांना मोठी पावती मिळाली आहे.
लोकसहभाग ठरला पर्यावरण संवर्धनाचा आधार
भोकणी ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या सहभागातून मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धन केले. यासोबतच पाणी व्यवस्थापन, जलसंधारण, जैवविविधता संरक्षण, अक्षय ऊर्जेचा वापर आणि पर्यावरणपूरक शाश्वत विकासाचे विविध उपक्रम राबविण्यात आले. ग्रामस्थांनी या उपक्रमांना दिलेल्या सक्रिय प्रतिसादामुळे गावात पर्यावरण संवर्धनाची चळवळ उभी राहिली.
Chhatrapati Shivaji Maharaj honored with Vanashree Award