‘पॅलेट गन’प्रकरणी गुन्हा दाखल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आंदोलनाला यश

नवी दिल्ली : प्रतिनिधी
‘नीट’ परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात आंदोलन करताना पोलिसांच्या पॅलेट गन गोळीबारात जखमी झालेल्या विद्यार्थ्याला न्याय मिळवून देण्यासाठी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुकारलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर शुक्रवारी सलग सहा तास केलेल्या ठिय्या आंदोलनानंतर, दिल्ली पोलिसांनी नमते घेत जखमी विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून अधिकृतपणे एफआयआर नोंदवून घेण्याची प्रक्रिया सुरू केली. पोलिसांच्या या सकारात्मक निर्णयानंतर राहुल गांधी यांनी ठिय्या आंदोलन संपवल्याची घोषणा केली आहे.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, 20 जुलै रोजी ‘सीजेपी’च्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांकडून जंतर-मंतर येथे उत्स्फूर्तपणे ‘संसद चलो’ आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या अमानुष कारवाईत साहिल लोचब या 19 वर्षीय तरुणाच्या डोळ्याला पॅलेट गनची गोळी लागून तो गंभीर जखमी झाला होता. या तरुणाच्या न्याय्य हक्कांसाठी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी शुक्रवारी थेट संसद मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेतली होती आणि पोलिसांकडे कारवाईसाठी आग्रह धरला होता.

’वरचे’ कारण सांगून गुन्ह्यास नकार

सुरुवातीला वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आदेशाचे कारण पुढे करत पोलिसांनी एफआयआर दाखल करण्यास स्पष्ट नकार दिला होता. मात्र, जोपर्यंत कायदेशीर गुन्हा दाखल होत नाही आणि तपास अधिकार्‍याचे नाव निश्चित केले जात नाही, तोपर्यंत आपण पोलीस ठाण्याबाहेरून हटणार नाही, अशी ठाम भूमिका राहुल गांधी यांनी घेतली. त्यांनी सलग सहा तास ठाण्याबाहेरच ठाण मांडल्याने प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला आणि अखेर पोलिसांना एफआयआर दाखल करून घेणे भाग पडले.

भाजपकडून टीका

एकीकडे आंदोलनाला यश आले असले तरी, यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही तीव्र झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री व भाजप नेते जे. पी. नड्डा यांनी राहुल गांधींच्या या आंदोलनावर सडकून टीका करत, याला केवळ ’कॅमेरा केंद्रित ड्रामा’ आणि राजकीय स्टंट म्हटले आहे. या घटनेची सर्वोच्च न्यायालयाने आधीच दखल घेतली असून, माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समिती तपास करत असताना, केवळ राजकीय स्वार्थासाठी आणि वंदे मातरम्सह इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष वळवण्यासाठी गांधी यांनी हे आंदोलन केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात
आला आहे.

 

Case registered in ‘pellet gun’ incident.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *