तरुणाचा आयफोनचा हट्ट; संभाजीनगरात संपले कुटुंब!

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगरजवळील वाळूज-तीसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर एका अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
‘पल आयफोन 15’ घेऊन देण्याच्या हट्टापायी एका तरुणाने डोंगरावरून उडी मारून टोकाचे पाऊल उचलले. यावेळी त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या आई-वडिलांनाही आपले प्राण गमवावे लागले आहेत. एका मोबाइलच्या वेडापायी संपूर्ण हसते-खेळते कुटुंब संपल्याने परिसरात आणि संपूर्ण जिल्ह्यात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेने तरुणांमधील वाढते महागड्या मोबाइलचे वेड आणि त्यातून उद्भवणार्‍या गंभीर धोक्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘आयफोन 15’ न मिळाल्याच्या रागातून सदर तरुण जीव देण्यासाठी खवड्या डोंगरावर गेला होता. ही बाब समजताच त्याचे आई-वडील त्याला समजावण्यासाठी आणि वाचवण्यासाठी तातडीने डोंगरावर पोहोचले. मुलगा डोंगराच्या अगदी कड्यावर उभा होता, तर आई-वडील त्याची समजूत काढत होते. याच दरम्यान, मुलाने उडी मारण्याचा प्रयत्न केला असता वडिलांनी त्याला वाचवण्यासाठी झेप घेतली; मात्र यात बाप-लेक दोघेही डोंगरावरून खाली खोल खाणीत कोसळले. आपल्या डोळ्यांदेखत नवरा आणि मुलगा दरीत कोसळल्याचा भयंकर धक्का सहन न झाल्याने सुन्न झालेल्या आईनेही त्याच डोंगरावरून खाली उडी घेतली. खाली खडकावर आपटल्याने या दुर्घटनेत तिघांचाही जागीच मृत्यू झाला.
कुणाल मुरलीधर चांदवडे (मुलगा), मुरलीधर चांदवडे (वडील) आणि संगीता चांदवडे (आई) अशी या घटनेतील मृतांची नावे आहेत. मुलगा आत्महत्या करणार असल्याची प्राथमिक माहिती आधीच मिळाल्यामुळे पोलीस आणि काही स्थानिक नागरिक घटनास्थळी पोहोचले होते; परंतु क्षणाधार्त त्यांच्या डोळ्यांदेखतच ही दुर्घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Young man’s insistence on an iPhone; entire family wiped out in Sambhajinagar!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *