तडीपार आदेशाचे उल्लंघन
सिडको : प्रतिनिधी
तडीपार आदेश लागू असतानाही नाशिक शहर व ग्रामीण जिल्ह्यात प्रवेश करून धारदार कोयता बाळगणार्या तरुणाला सातपूर पोलिसांनी अटक केली. अमोल संजय मांजरे (वय 24, रा. आम्रपाली चौक, प्रबुद्धनगर, सातपूर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री अडीचच्या सुमारास प्रबुद्धनगर, अशोकनगर परिसरातील नंदिनी हॉटेलच्या बाजूला मांजरे हा संशयास्पदरीत्या आढळला. त्याच्याकडे सुमारे 19 इंच लांबीचा लोखंडी कोयता आढळला. या कोयत्याला सुमारे 14 इंच लांबीचे धारदार पाते आणि पाच इंचाची मूठ असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मांजरे याच्याविरुद्ध सातपूर आणि अंबड पोलिस ठाण्यात यापूर्वी चोरीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध पोलिस उपायुक्त, परिमंडळ-2, नाशिक शहर यांनी 3 डिसेंबर 2025 रोजी तडीपार आदेश काढला होता. त्यानुसार 13 डिसेंबर 2025 ते 12 डिसेंबर 2027 या कालावधीत त्याला नाशिक शहर व नाशिक ग्रामीण जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.
तडीपार आदेश लागू असतानाही नाशिकमध्ये प्रवेश केल्याने, तसेच पोलिस आयुक्तांनी जारी केलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून धारदार शस्त्र बाळगल्याने त्याच्याविरुद्ध सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
Youth arrested with a sharp sickle.