खासदार राजाभाऊ वाजे यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी
नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये येणार्या लाखो भाविकांना
दर्जेदार आणि तातडीची आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी व्यापक नियोजन करण्याची गरज आहे. कुंभमेळ्यापुरतीच आरोग्य व्यवस्था मर्यादित न ठेवता तिचा उपयोग कुंभमेळ्यानंतरही नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना व्हावा, अशी मागणी खासदार राजाभाऊ वाजे यांनी केली.
सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण कार्यालय, जुने जिल्हा परिषद भवन, नाशिक येथे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत कुंभमेळ्याच्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. यावेळी खासदार वाजे यांनी बैठकीत विविध महत्त्वपूर्ण विषय मांडत विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, जिल्हा शासकीय रुग्णालयातील समस्या, आरोग्य विभागातील मनुष्यबळाची कमतरता तसेच कर्मचार्यांच्या प्रश्नांकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले.
कुंभमेळ्यातील पर्वणीचा कालावधी संपल्यानंतरही मोठ्या गर्दीमुळे संसर्गजन्य व जलजन्य आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पर्वणी संपल्यानंतरही काही काळ वैद्यकीय पथके, तपासणी केंद्रे, रुग्णालयीन सुविधा आणि आवश्यक आरोग्य यंत्रणा कार्यरत ठेवावी, अशी मागणी वाजे यांनी केली.
सध्या शवविच्छेदनाची सुविधा प्रामुख्याने जिल्हा रुग्णालयात उपलब्ध असल्याने कुंभमेळ्याच्या काळात त्यावर मोठा ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेच्या रुग्णालयांसह आवश्यक ठिकाणी शवविच्छेदनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. कुंभमेळ्याच्या गर्दीत मानसिक रुग्ण, वयोवृद्ध अथवा निराधार व्यक्तींंना त्यांच्या नातेवाइकांकडून सोडून जाण्याच्या घटना घडण्याची शक्यता आहे. तसेच कुंभमेळ्यानंतर निराधार व भिक्षेकर्यांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांच्यासाठी निवारा, वैद्यकीय तपासणी, समुपदेशन आणि पुनर्वसनाची स्वतंत्र व्यवस्था उभारावी, असेही खासदार वाजे यांनी सांगितले.
कुंभमेळ्याच्या काळात शासकीय रुग्णालयांवरील ताण कमी करण्यासाठी खासगी रुग्णालयांचा प्रभावी सहभाग करून घ्यावा. आयुष्मान भारत योजना अथवा शासनाच्या इतर आरोग्य योजनांच्या माध्यमातून पात्र भाविकांना खासगी रुग्णालयांतही मोफत किंवा कॅशलेस उपचार मिळतील, याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
प्रथमच खासदार कुंभच्या बैठकीला आमंत्रित
मागील दोन वर्षांत प्रथमच खासदार राजाभाऊ वाजे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कुठल्यातरी बैठकीला आमंत्रित होते. त्यांनीदेखील या बैठकीत उपस्थित राहत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले. या निमंत्रणामागे प्रशासनाला जाग आल्याचे कारण होते की, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि खासदार राजाभाऊ वाजे हे खूप चांगले आणि जुने मित्र आहेत म्हणून त्यांना आमंत्रण मिळाले होते याची चर्चा बैठकीनंतर रंगली होती.
कुंभमेळ्यासाठी उभारली जाणारी आरोग्य व्यवस्था ही केवळ पर्वणीपुरती मर्यादित. पर्वणीनंतर उद्भवणारे संसर्गजन्य आजार, निराधार वयोवृद्ध व मानसिक रुग्णांचा प्रश्न आणि शासकीय रुग्णालयांवरील संभाव्य ताण लक्षात घेऊन आतापासूनच सर्वंकष नियोजन करणे आवश्यक आहे.
– खा. राजाभाऊ वाजे, नाशिक
Permanently strengthen the health infrastructure of the Kumbh Mela.