त्र्यंबकेश्वरच्या वाहतूक व्यवस्थेची पाहणी

पालकमंत्री गिरीश महाजन यांचा एसटीच्या बसने प्रवास

नाशिक : प्रतिनिधी
श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची मोठी गर्दी होत असताना वाहतूक व्यवस्था आणि प्रशासनाच्या नियोजनाची पाहणी करण्यासाठी राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन, कुंभमेळामंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी सकाळी खंबाळे वाहनतळ ते त्र्यंबकेश्वरदरम्यान एसटी बसने प्रवास केला. आपल्या वाहनांच्या ताफ्यामुळे भाविकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये, यासाठी त्यांनी एसटीने प्रवास करण्यास प्राधान्य दिले.
पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासमवेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह आदींनीही एसटीच्या बसने प्रवास केला.
देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे श्रावणी सोमवारनिमित्त राज्याच्या विविध भागांसह देशभरातून हजारो भाविक दर्शनासाठी, तसेच ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी दाखल होतात.
श्रावणातील पहिल्या सोमवारी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने त्र्यंबकेश्वर शहरापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर खंबाळे येथे वाहनतळाची व्यवस्था केली आहे.
खंबाळे वाहनतळावर वाहने उभी करून तेथून भाविकांना एसटी बसद्वारे त्र्यंबकेश्वर येथे नेण्याची आणि दर्शनानंतर पुन्हा वाहनतळावर परत आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
या नियोजनाची प्रत्यक्ष पाहणी करताना पालकमंत्री महाजन यांनी बसमधून प्रवास करून भाविकांना उपलब्ध करून दिलेल्या वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला.
यावेळी त्यांनी श्रावणी सोमवारनिमित्त जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती घेतली. भाविकांची गैरसोय होऊ नये, वाहतूक सुरळीत राहावी आणि गर्दीचे योग्य व्यवस्थापन व्हावे, यासाठी संबंधित अधिकार्‍यांना आवश्यक सूचना दिल्या. प्रशासनाच्या नियोजनाची प्रत्यक्ष पाहणी करण्याबरोबरच भाविकांच्या सोयीला प्राधान्य देत पालकमंत्र्यांनी एसटीच्या बसने केलेला प्रवास लक्षवेधी ठरला.

Inspection of the traffic system in Trimbakeshwar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *